करोनाने दिला स्वच्छतेचा मंत्र

करोनाने दिला स्वच्छतेचा मंत्र
करोना अपडेट

नाशिक | दिनेश सोनवणे | Nashik

करोनाकाळात (Corona) सर्वाधिक खप होणार्‍या गोष्टींमध्ये सॅनिटायझर, सोप, हॅण्डवॉश आघाडीवर राहिले. आजही या वस्तूंना मागणी आहेच. घरात जिथे साधा कधी साबण दिसत नव्हता तिथे या सर्व गोष्टी दिसू लागल्या...

लग्नसमारंभ असले तरी तिथे सॅनिटायझरचे (Sanitizer) फवारे मारले जायचे. एवढी काळजी आपण कधीही घेतलेली नव्हती. मात्र करोना (Corona) आला आणि त्याने सगळेच बदलून टाकलेले आपण सर्वांनी जवळून बघितले.

खाण्या-पिण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे (Hand washing) गरजेचे आहे. साबण आणि पाण्याने 20 सेकंद हात धुवायला पाहिजेत. भरपूर पाणी (Water) पिणे अत्यंत गरजेचे आहे, उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे पाणी भरपूर प्यावे.

घराबाहेर पडताना नाक, तोंड झाकणारा सेफ्टी मास्क (Mask) वापरावा. हे मास्क स्वच्छही ठेवावे. नाहीतर त्यातच विषाणू राहण्याचा धोका असतो.

खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल किंवा हात धरायलाच हवा. खरेतर करोनाच्या धास्तीनेच नव्हे तर अन्य वेळाही ही किमान काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून जंतू संसर्ग टाळता येतो. न धुतलेल्या हातांनी डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करू नका, असेही अनेक तज्ज्ञ मंडळी सांगताना आपल्याला दिसली.

घराबाहेर पडणारी प्रत्येक व्यक्ती घरात परतल्यावर स्वत:ला सॅनिटाईज करत होती. आपण कुठे-कुठे फिरलो होतो, त्यामुळे कपडे इतरत्र ठेवून डेटॉल किंवा तत्सम औषधाचे मिश्रण पाण्यात करून निर्जंतूक होण्यासाठी आपण प्रयत्न करायचो. याआधी घरी परतल्यावर कधीच आपण अंघोळ केलेली नव्हती हे मान्य करावे लागेल.

आपल्यासोबत आपल्या कुटुंबाची काळजीदेखील आपण तितक्याच प्रमाणात घेत होतो. साधा सर्दी-खोकला आला तरी आपण पटकन वाफ घेणे, गोळ्या औषधे घेणे किंवा डॉक्टरचा सल्ला घेण्यासाठी आपण तत्काळ बाहेर पडायचो. वर्क फ्रॉम होम सुरू असेल तेव्हा तर कुटुंब अधिक जवळ आलेले आपण पाहिले.

सकाळ-दुपार-संध्याकाळ काहीही असो काळजी आणि काळजीच आपल्याला एकमेकांच्या प्रती दिसून येत होती. हातात मोजे घालण्यापासून डोक्यावर जंतुरोधक हेल्मेटपर्यंत सर्वच गोष्टी नित्यनेमाने सर्वांनी पाळालेल्या आपण बघितल्या. यापुढेही अशी अनेक संकटे येतील, आपल्याला संघर्ष करायचा आहे.

करोनाने (Corona) संघर्ष करायला शिकवले आहे. त्यामुळे खचून न जाता तेवढ्याच ताकतीने संघर्ष करण्याची गरज आहे. आपण गेली दोन वर्षे घेतलेली काळजी सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मेहनत करायची आहेच, शिवाय काळजीही घ्यायची आहे. स्वत:ची तर काळजी आपल्याला घ्यावीच लागेल शिवाय कुटुंबातील सदस्य, मित्र परिवार यांच्यासह समाजातील प्रत्येकाची काळजी आपल्याला घ्यावयाची आहे, हे मात्र तेवढेच खरे!

Related Stories

No stories found.