नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील बहूचर्चित स्वस्त धान्य घोटाळ्यातील मुख्य संशयित असलेल्या घोरपडे बंधूना इ़ऱ्डीच्या नागपूर येथील पथकाने अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने आठ दिवसांची कोठडी दिली आहे. त्यांच्यावर धान्य घोटाळा प्रकरणी मोक्का दाखल करण्यात आला होता.

जिल्ह्यातील स्वस्त धान्याच्या गैरव्यवहार प्रकरणी नागपूर येथील डायरेक्टर ऑफ इन्फोरसमेंट (ईडी) तर्फे चौकशी सुरु झाली असून यातील संशयित संपत नामदेव घोरपडे, अरुण नामदेव घोरपडे आणि विश्वास नामदेव घोरपडे (रा. नवीन नाशिक) या तिन्ही घोरपडे बंधूवर मनी लॉड्रींग अंतर्गत ईडीने कारवाई सुरु केली आहे. यामुळे 177 कोटी रुपयांचे गैरव्यवहार प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

राज्यात यापूर्वीच घोरपडे बंधूवर मोक्कातगत कारवाई झाली आहे. सरकारी गुदामातील धान्य काळ्या बाजारात विक्री प्रकरणी सुरु असलेल्या या कारवाईत जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सरकारी धान्य वितरणाच्या व्यवस्थेत संघटितपणे काळ्या बाजारात विक्रीतून 177 कोटीच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे.

काय आहे धान्य घोटाळा

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठा समजला जाणारा वाडीवर्हे रेशन धान्य घोटाळा 2015 मध्ये उघडकीस आला. यात रेशन दुकानांसाठी जाणारे धान्य परस्पर ट्रकमध्ये भरून फ्लोर मिलसाठी विक्री केले जात होते. वाडीवर्हे येथे नागरिकांनीच हा ट्रक पकडल्यानंतर हा घोटाळा समोर आला होता.

यात नाशिक ग्रामिण पोलिसांनी 1 जून 2015 रोजी मोक्का अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. यामध्ये तिन्ही घोरपडे बंधू, काशीनाथ पाटील, पुनम होळकर, ज्ञानेश्वर घुले, धरमसिंग पटेल, मुख्य सुत्रधार जितेंद्र ठक्कर, धनंजय कचरू वामन, कोल्हापूर येथील गणपती रोल्स फ्लोअर मिलचा मालक अश्विनी जैन, मॅनेजर प्रकाश शेवाळे अशा 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व संशयितांची 170 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.