मांजरीला पकडण्याच्या नादात बिबट्या पडला विहिरीत

मांजरीला पकडण्याच्या नादात बिबट्या पडला विहिरीत

सिन्नर | Sinnar

तालुक्यातील कणकोरी (Kankori) येथे मांजरीची शिकार करण्याच्या नादात बिबट्या (Leopard) विहिरीत (Well) पडल्याची घटना आज दि. ५ सप्टेंबर रोजी घडली...

दिवसभराच्या परिश्रमानंतर या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

शेतकरी गणेश सांगळे (Ganesh Sangle) यांच्या विहिरीत शनिवारी रात्रीच्या वेळी मांजरीची शिकार करण्याच्या नादात बिबट्या व मांजर विहिरीत पडले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

रात्रभर या विहिरीत बिबट्या व मांजर यांचा मुक्काम राहिला. मात्र सकाळ होताच बिबट्याच्या डरकाळीच्या आवाजाने परिसरातील शेतकऱ्यांनी सांगळे यांच्या विहिरीकडे धाव घेतली. यावेळी विहिरीच्या मधोमध असणाऱ्या कपारीवर बिबट्या दडून बसलेला दिसून आला.

तर त्याच्या दुसऱ्या बाजूला मांजर काठावर बसलेली दिसून आली. शेतकऱ्यांनी सरपंच रामनाथ सांगळे (Ramnath Sangle) यांना याबाबत माहिती दिली. सांगळे यांनी वनविभागाला (Forest Department) तत्काळ याबाबत माहिती दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी पोलीस प्रशासनालाही बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले. बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाने विहिरीत पिंजरा सोडला. मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत बिबट्या पिंजऱ्यात येऊ शकला नाही. वनविभागाचे 15 ते 20 कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते.

वन विभागाच्या अथक परिश्रमानंतर विहिरीत पडलेला बिबट्या सायंकाळी पिंजऱ्यात आल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. बिबट्याला सिन्नरमधील मोहदरी उद्यानात हलवण्यात आले आहे.

यावेळी वनक्षेत्रपाल अधिकारी मनीषा जाधव (Manisha Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अनिल साळवे, सुजित मोकडे, वनरक्षक आकाश रूपवते, चंद्रमणी तांबे, किरण गोराडे, नारायण वैद्य, वसंत आव्हाड, मधुकर शिंदे, एकनाथ आगिवले, सोमनाथ जेडगुले यांच्यासह शेतकऱ्यांनी बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यास सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com