शिवरायांचा वारसा जपावा लागेल

शिवरायांचा वारसा जपावा लागेल

खाकुर्डीत पुतळा अनावरणप्रसंगी पालकमंत्री भुजबळ यांचे आवाहन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) सुराज्य उभे करत त्याचे सुराज्यात रूपातर केलेच परंंतु राज्य कसे चालवावे याचे उत्तम उदाहरण दिले आहे. अन्यायाविरोधात बंंडाची मशाल पेटविणारे छत्रपतींचे विचार संकटावर मात करण्याचे शिकवितात. छत्रपती शिवरायांचा मिळालेला हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांच्या विचारांवर प्रत्येकास अविरत कार्य करावे लागेल, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी येथे बोलतांना केले.

तालुक्यातील खाकुर्डी येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे (Statue) पालकमंत्री छगन भुजबळ तसेच कृषीमंत्री दादा भुसे (agriculture minister dada bhuse) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थित विराट जनसमुदायास मार्गदर्शन करताना पालकमंत्री भुजबळ बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर शिवचरित्रकार प्रा. नितीन बानगुडे पाटील,

कृउबा सभापती राजेंद्र जाधव, मामको चेअरमन राजेंद्र भोसले, शिवशाहीर विजय तनपुरे, उपमहापौर नीलेश आहेर, सखाराम घोडके, तालुकाप्रमुख संजय दुसाने, उपसभापती सुनील देवरे, दिनेश ठाकरे, संदीप पवार, खाकुर्डी सरपंच जयराम ठाकरे, शिल्पकार आनंद सोनवणे, राजेंद्र ठाकरे, बी.डी. ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फुले (Mahatma Phule) यांनी सर्वप्रथम शोधून काढली. या समाधी परिसराची स्वच्छता करून समाधीवर पुष्प अर्पण करत पूजन केले. मात्र त्या काळातही समाजकंटकांनी ती फुले अस्तावस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. महापुरुषांचा इतिहास कसा लपून राहील यासाठी नेहमीच कटकारस्थान करण्यात आल्याची खंत भुजबळ यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील प्रत्येक नागरिकाला आपल्या राजाची विशेष काळजी होती. स्वराज्यात कुठले लोक येतात, याकडे लहानग्यांपासून वयोवृद्ध नागरीक विशेष लक्ष ठेवून असायचे. महाराज राज्यातील प्रत्येक नागरिकांचे हित जोपासत. आपल्या राज्यात त्यांनी महिलांना विशेष सन्मान आणि आदर होता. त्यांचा प्रत्येक शिलेदार स्वराज्याच्या हितासाठी आणि आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी लढला.

त्यांची युद्धाची रणनीती आणि गनिमी कावा अनेक युद्धाना मार्गदर्शक ठरला आहे. त्यांचे हे विचार चिरकाल टिकविण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, असे भुजबळ यांनी शेवटी बोलतांना सांगितले. छत्रपती शिवरायांकडे असलेल्या हजारो गुणांपैकी एक गुण जरी आपल्याकडे असला तरी आपले जीवन सार्थकी लागू शकणार असल्याचे सांगत कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी संपूर्ण जिल्ह्याला आनंद वाटेल असे स्मारक खाकुर्डी गावात साकारले गेले आहे.

मोलमजुरी करणार्‍या एका आजीने स्मारकासाठी दिलेले दोनशे रूपये छत्रपतींबद्दल असलेल्या प्रेमाची व आदराची साक्ष देणारे ठरतात. खाकुर्डीत पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या शिवसेना कार्यालयाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी सुटण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास ना. भुसे यांनी शेवटी बोलतांना व्यक्त केला.

छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपुर्ण गावात भगवे ध्वज व पताकांमुळे शिवशाही (Shivshahi) अवतरली होती. प्रास्ताविक कृष्णा ठाकरे यांनी तर सूत्रसंचालन नवनाथ चित्ते यांनी केले. मोठ्या संख्येने नागरीक या कार्यक्रमास उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी ठरली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com