नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

भारतामध्ये दिवसेंदिवस सेंद्रिय शेतीचे महत्व वाढत आहे. याच अनुषंगाने मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय येथे आत्मा नाशिक, कृषी विभाग आणि बायोसर्ट प्रा. लि. यांच्या संयुंक्त विद्यमाने सेंद्रिय शेती गट मार्गदर्शकांचे निवासी प्रशिक्षण पार पडले.

प्रशिक्षणाच्या उदघाटन प्रसंगी आत्मा नाशिक, प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, उपसंचालक वंदना शिंदे, तालुका व्यवस्थापक रावसाहेब पाटील, कृषी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. आय. बी. चव्हाण, प्रशिक्षणार्थी अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रशिक्षणामध्ये कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. दीपक शिंदे, प्रा. पी. बी. चौहाण, बायोसर्ट चे प्रमाणीकरण अधिकारी बाळासाहेब खेमणर आणि इतर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सेंद्रिय कीड नियंत्रण, देशी गायीचे संगोपन, बीजामृत-जीवामृत निर्मिती, बायो-डायनॅमिक पद्धतीने कंपोस्ट निर्मिती तसेच सेंद्रिय पदार्थांची निर्मिती, विपणन अशा विषयांवर प्रभावीपणे मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनसोबतच प्रशिक्षणार्थींसाठी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर सेंद्रिय शेतीसंदर्भात विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा लाभ १८ सेंद्रिय शेती गट मार्गदर्शकांनी घेतला.

या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांच्या सेंद्रिय शेतीकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल होऊन इतर शेतकऱ्यांना मार्गदशनासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याचे प्रशिक्षणार्थीकडून सांगण्यात आले.

सदर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पाडण्यामध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. एन. एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संपूर्ण प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण समन्वयक म्हणून कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. व्ही. एन गमे यांनी जबाबदारी पार पाडली.