शाळेतच दाखले देण्याची संकल्पना रखडली

‘आपले सरकार’ संकेतस्थळावर मदार
शाळेतच दाखले देण्याची संकल्पना रखडली

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दरवर्षी दहावी व बारावी निकालानंतर प्रवेशासाठी शैक्षणिक दाखले मिळवण्यासाठी सेतू व आपले सरकार सेवा केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्याना शाळेतच दाखले उपलब्ध करुन देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. मात्र तांत्रिक व इतर अडचणीमुळे ही योजना फारशी यशस्वी होऊ शकली नाही. त्यात सेतू केंद्र बंद असल्याने दाखले मिळविण्यासाठी आपले सरकार हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. त्यातही शहर व जिल्ह्यातील कंटेंटमेंट झोनमधील आपले सरकार सेवा केंद्र बंद आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांपुढे दाखले मिळवताना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

इयत्ता दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी लागणार्‍या दाखल्यांसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज दाखल केले जातात. त्यामुळे निर्माण होणार्‍या सर्व्हरच्या अडचणी आणि डिजिटल सिग्नेचरसाठी दाखले रखडले जात असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या तारखेपर्यंत महत्वाचे दाखले मिळत नाही. शेवटी विद्यार्थ्यांना अर्ज सादर केल्याची पावती जोडून दाखल्यांची प्रतीक्षा करावी लागते.

विद्यार्थी आणि पालकांच्या तक्रारीमुळे विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले मिळू शकतील अशी संकल्पना जिल्हा प्रशासनाने आखली होती. त्यासाठी मुख्याध्यापकांची बैठक देखील घेण्यात आली होती. परंतु नंतरच्या काळात जिल्हा प्रशासन अनेक कार्यक्रमांच्या नियोजनात गुंतल्याने हा विषय मागे पडला.बारावीचा निकाल नुकसाच जाहीर झाला असून आता दहावीच्या परीक्षेचा निकालही लागणार आहे.

या निकालानंतर प्रवेशासाठी लागणारे जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, अधिवास दाखला, अल्पभुधारक, डोंगणी, नॉन क्रिमिलिअर असे अनेक दाखले काढण्यासाठी अर्ज दाखल होतात. यंदा करोनामुळे परिस्थिती भीषण असल्याने विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त घरूनच अर्ज दाखल करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सायबर कॅफेवरही गर्दी होत असल्याने गर्दीच्या ठिकाणी विद्यार्थी जाऊ नये यासाठी पालकांना देखील सतर्क राहावे लागणार आहे. ज्याला शक्य आहे अशा विद्यार्थ्यांनी आपले सरकार केंद्रावर घरूनच अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईनच दाखले वितरीत केले जाणार आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com