मालेगाव तालुका वार्तापत्र : गटांची वाढ तालुक्याचा दबदबा वाढवणारी

मालेगाव तालुका वार्तापत्र  : गटांची वाढ तालुक्याचा दबदबा वाढवणारी

मालेगाव | हेमंत शुक्ला ( Malegaon )

मालेगाव - मिनी मंत्रालय संबोधल्या जाणार्‍या जिल्हा परिषद ( Zilla Parishad ) व पंचायत समितीच्या ( Panchayat Samiti ) गट-गणांची पुर्नरचना (Reorganization of Gat & Gan )करण्यात येवून गट-गणांचे प्रारूप आराखडे नुकतेच जाहिर करण्यात आले आहे. या पुर्नरचनेत अस्ताने व टाकळी या दोन गटांची तर पंचायत समितीच्या चार गणांची वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यात गटांची संख्या 9 तर पंचायत समिती गणांची संख्या 18 झाली आहे.

गट-गणांच्या फेर रचनेत पुर्वीच्या गट-गणातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आली आहे. यामुळे गत एक-दोन वर्षापासून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीकोनातून गट-गणात मोर्चेबांधणी करणार्‍या इच्छुकांचे श्रम वाया गेल्याने त्यांच्यात काहीसे निराशेचे वातावरण पसरले आहे. गट-गणांची पुर्नरचना करतांना मालेगाव बाह्य मतदार संघ व नांदगाव मतदार संघातील गावे त्या-त्या मतदारसंघातच समाविष्ट करण्यात आली आहेत.

यामुळे गाव तालुक्यात मात्र विधानसभा मतदारसंघ वेगळा हे चित्र बदलण्याबरोबर भविष्यातील राजकीय शह-काटशहास देखील ब्रेक बसू शकणार असल्याचे संकेत राजकीय धुरीणांतर्फे दिले जात आहे. तालुक्यात दोन गट व चार गणांची झालेली वाढ मात्र निवडणूक लढवू इच्छिणार्‍यांचा उत्साह वाढविणारी ठरली आहे. 9 गटांमुळे तालुक्याचा दबदबा आगामी काळात जिल्हा परिषदेत वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचा उत्साह वाढला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार गट-गणांची पुर्नरचना झाली आहे. मालेगाव तालुक्यात अस्ताने व टाकळी हे दोन नवीन गट तर गाळणे, अस्ताने, टाकळी व जळगाव निं. हे चार नवीन गण अस्तित्वात आले आहेत. विशेष म्हणजे वडनेर गट-गणांचे अस्तित्व या पुर्नरचनेत संपुष्टात येवून पुर्वीचा वडेल गट पुन्हा उदयास आला आहे.

याबरोबर पाटणे, चिखलओहोळ, डोंगराळे हे गण देखील रद्द झाले आहेत. गट-गणांची पुर्नरचना करतांना मालेगाव बाह्य मतदार संघ व नांदगाव मतदार संघातील गावे त्या-त्या मतदार संघात राहतील याची दक्षता घेतली गेली आहे. यामुळे पुर्वीच्या बहुतांश सर्वच गट-गणातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार झाली आहे. सौंदाणे गटात पुर्वीचेच सौंदाणे, नांदगाव व वाके हे तीनच गावे ठेवण्यात येवून उर्वरित सर्व गावे नव्याने उदयास आलेल्या टाकळी गटास जोडली गेली आहे .

तर दाभाडी गटातील टेहरे, मुंगसे, पाटणे व आघार ही गावे देखील सौंदाणे गटात समाविष्ट करण्यात आली आहेत. निमगाव गटातून चंदनपुरी गण तोडण्यात येवून तो सौंदाणे गटात जोडला गेला तर मेव्हुणे, घोडेगाव आदी गावे टाकळी गावात समाविष्ट केली गेली. वडनेर गटातील काही गावे झोडगे गटात तर झोडगे गटातील काही गावे नव्याने उदयास आलेल्या अस्ताने गटात समाविष्ट झाली आहे.

पुर्वीच्या सर्वच गट-गणातील गावांची या पुर्नरचनेत फेरफार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. गावांची ही फेरफार कुणाच्या पथ्यावर पडणारी ठरणार आहे हे आगामी काळातच स्पष्ट होणार असले तरी गत एक-दोन वर्षापासून निवडणूक लढवायचीच या दृष्टीकोनातून गट-गणात जनसंपर्कासह इतर उपक्रमांमध्ये सहभागी होत मतदार राजांच्या गाठीभेटी घेणार्‍या इच्छुकांना या पुर्नरचनेचा मात्र फटका बसला असून गट-गणात नवीन गावे समाविष्ट झाल्याने जनसंपर्काचा त्यांना नव्याने श्रीगणेशा करावा लागणार आहे.

टाकळी-अस्ताने गट तसेच गाळणे, अस्ताने, टाकळी व जळगाव निं. या चार गणांच्या निर्मितीमुळे अनेक इच्छुकांच्या आशा मिनी मंत्रालयात जाण्यासाठी पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. गट-गण अपेक्षेनुसार अस्तित्वात आले असले तरी त्यांच्या आरक्षणाची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. त्यामुळे आरक्षण महिला अथवा राखीव निघाल्यास काय? ही चिंता देखील इच्छुकांची अस्वस्थता वाढविणारी ठरली आहे.

गट-गणांचे प्रारूप आराखडे जाहिर झाले असल्याने लवकरच जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. गट-गणात कोणती गावे समाविष्ट आहेत हे देखील स्पष्ट झाल्याने निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्यांनी चाचपणी सुरू करत व्युहरचना आखण्यास प्रारंभ केला आहे. गट-गणांची पुर्नरचना काहींच्या अडचणीची तर काहींच्या पथ्यावर पडणारी देखील ठरली आहे. शिवसेना, भाजपमध्ये इच्छुकांची मांदियाळी आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस पक्ष देखील ताकदीनुसार निवडणूक मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी निश्चित करतांना राजकीय नेत्यांचे कसब पणास लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गट-गण प्रारूप आराखडा

अस्ताने गट : गाळणे गण : चिंचवे गा., लुल्ले, कजवाडे, वळवाडे, वळवाडी, पोहाणे, गारेगाव, विराणे, गाळणे.

अस्ताने़ गण : नागझरी, डोंगराळे, भारदेनगर, घाणेगाव, कौळाणे गा., वनपट, टिंगरी, मोहपाडे, राजमाने, लखाने, अस्ताने, टोकडे.

झोडगे गट : झोडगे गण : झोडगे, गुगुळवाड, पळासदरे, भिलकोट, कंधाणे, जळकू, साजवाळ, नाळे.

वडगाव गण : वडगाव, दसाणे, खडकी, लोणवाडे, माणके, दहिकुटे, सायने, देवारपाडे, चिखलओहोळ.

कळवाडी गट : कळवाडी गण : शेरूळ, पाडळदे, सायतरपाडे, हिसवाळ, देवघट, दापुरे, कळवाडी, साकुर, नरडाणे

चिंचवे गण : शेंदुर्णी, रोझे, चिंचगव्हाण, दहिवाळ, बोधे, उंबरदे, सवंदगाव, माल्हणगाव, खलाणे, सिंताणे, रोंझाणे, गिगाव.

वडेल गट : करंजगव्हाण गण : गरबड, निमशेवडी, मोरदर, टिपे, कंक्राळे, दहिदी, कुकाणे, करंजगव्हाण, हाताणे.

वडेल गण : खाकुर्डी, कोठरे, कोठरे बु., कोठरे खु., डाबली, वडेल, वडनेर, सावतावाडी.

रावळगाव गट : रावळगाव गण : सातमाने, रावळगाव, दुंधे, तळवाडे.

अजंग गण : पिंपळगाव, काष्टी, लेंडाणे, वजीरखेडे, अजंग.

दाभाडी गट : चिंचावड गण : जळगाव गा., बेळगाव, पांढरूण, ढवळेश्वर, गणेशनगर, आघार बु., चिंचावड.

दाभाडी गण : दाभाडी, निळगव्हाण.

सौंदाणे गट : सौंदाणे गण : आघार खु., पाटणे, नांदगाव बु., नांदगाव खु., सौंदाणे.

चंदनपुरी गण : चंदनपुरी, टेहरे, मुंगसे, वाके.

टाकळी गट : टाकळी गण : एरंडगाव, झाडी, शिरसोंडी, सोनज, मांजरे, टाकळी, सावकारवाडी.

जळगाव निं. गण : नगावदिगर, मेव्हुणे, घोडेगाव, घोडेगाव चौकी, कौळाणे निं., वर्‍हाणे, वर्‍हाणेपाडा, जळगाव निं., काळेवाडी, चोंढी.

निमगाव गट : निमगाव गण : साकुरी निं., ज्वार्डी बु., ज्वार्डी खु., पाथर्डे, निमगाव, निंबायती, जाटपाडे, चौकटपाडे, जेऊर.

येसगाव बु. गण : अजंदे, भुईगव्हाण, अजंदे बु., अजंदे खु., मळगाव, येसगाव बु., येसगाव खु., मथुरपाडे, खायदे, गिलाणे, निमगुले, डुबगुले, निमगुले बु., निमगुले खु., निमगाव खु.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com