
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कांद्याला (Onion) ३०० रुपये अनुदान जाहीर करून राज्य सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार (Ravindra Pagar) यांनी केली आहे...
शेतकरी बांधवांना प्रति क्विंटल सुमारे १५०० रुपये इतका उत्पादन खर्च येत असताना सरकारने किमान १००० रुपये अनुदान देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
कांदा अत्यंत कवडीमोल भावाने विकला जात आहे. कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याने नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन करून कांद्याला २५०० रुपये हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली होती.
मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील चांदवड येथील आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारला कांद्याला ३०० रुपये अनुदान जाहीर करावे लागले आहे. परंतु इतके तुटपुंजे अनुदान जाहीर करून राज्य सरकारने आर्थिक अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
त्यामुळे शेती व शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मोडकळीस येणार आहे. म्हणून राज्य सरकारने तातडीने कांद्याला १००० रुपये इतके अनुदान द्यावे, अशी मागणी पगार यांनी केली आहे.