ऑक्सिजन व्यवस्थेसाठी वणीकरांनी दिला मदतीचा हात

ऑक्सिजन व्यवस्थेसाठी वणीकरांनी दिला मदतीचा हात

वणी । रितेश पारख

ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन खाटांसहीत व्यवस्था करण्यात येत आहे. ऑक्सिजन सिलिंडरसाठी 6 लाख 71 हजार रुपये वर्गणीतून जमा करायचे होते. यामुळे ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन प्रणाली सुरू होणार असल्याने ही बाब समाज माध्यमातून सर्वत्र फिरू लागली. तोच धागा पकडत वणीकर ग्रुपवर आवाहन करण्यात आले. त्याला अनुसरून मदतीचा ओघ सुरू झाला आणि बघता बघता दोन लाखापेक्षा जास्त रक्कम जमा झाली.

वणी येथील ग्रामपालिका, नागरिक, प्रशासकीय यंत्रणा करोना योद्ध्यांचे काम करत असताना दुसरीकडे मात्र वाढत्या करोनाबाधितांच्या कोविड सेंटरमधील यंत्रसामुग्रीसाठी ‘मी वणीकर’ या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. वणी गावातील नागरिक, व्यावसायिक, प्रशासनातील अधिकारी, सेवक, शेतकरी, कष्टकरी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, उद्योजक, प्राध्यापक व्यापारीवर्ग, समाजातील सर्व स्तरातून देणगीचा ओघ सुरू झाला आहे. उपलब्ध झालेल्या निधीची रक्कम नव्याने सुरू होत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधे जम्बो ऑक्सिजन व्यवस्था अद्ययावत पद्धतीने कार्यान्वित होण्यास मदत होणार आहे.

जगदंबा देवी ट्रस्ट व अनेक विविध क्षेत्रातील देणगीदारांनी सढळ हाताने मानवतेच्या दृष्टिकोनातून संकटाच्या काळात आर्थिक हातभार लावल्याने कोविड सेंटरमधील 25 खाटांच्या क्षमतेसाठी दोन ड्युरा ही ऑक्सिजन पुरवठ्याची सेवा कार्यान्वित होणार आहे. समाजोपयोगी कार्यासाठी सतीश जाधव, बंटी सय्यद, तुषार देशमुख, गब्बर मनियार व वणीकर ग्रुपच्या सदस्यांनी या सर्व सामाजिक कार्याची आवड असणार्‍या कार्यकर्त्यांनी निधी संकलनासाठी पाठपुरावा करत केवळ दोन दिवसांतच चांगली रक्कम उपलब्ध करून दिली. आयसोलेशन वॉर्ड सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे.

यासाठी सरपंच सुनीता भरसठ, उपसरपंच देवेंद्र गांगुर्डे, माजी उपसरपंच विलास कड, माजी सरपंच मनोज शर्मा यांनी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. यामुळे करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मदत होईल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com