अग्नितांडवात घरासह दुकान भस्मसात

अग्नितांडवात घरासह दुकान भस्मसात

मुल्हेर । वार्ताहर Mulher

बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka )गोळवाड (Golwad )येथे सिलिंडरमधील गॅस लिक झाल्याने गॅस शेगडी पेटवताच अचानक भडका उडून घरासह किराणा दुकानास लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्यासह धान्य, कपडे, फर्निचर, कपाट व पाच लाखांची रोख रक्कम असा सुमारे 21 लाखांचा मुद्देमाल या अग्नितांडवात भस्मसात झाला. आग विझवण्याचा प्रयत्न करणारे भटू महाले व त्यांची पत्नी लताबाई हे दाम्पत्यदेखील आगीच्या ज्वाळांनी गंभीररीत्या भाजले.

घरातून आगीचे लोळ बाहेर पडत असल्याचे लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गंभीररीत्या भाजलेल्या महाले दाम्पत्याला तातडीने घरातून बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनाने आगीवर पाणी फेकत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन ते अडीच तासांनंतर ही आग आटोक्यात आली. सटाणा नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबास घटनास्थळी पोहोचण्यास रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वेळ लागला. मात्र तोपर्यंत आग आटोक्यात आणण्यास ग्रामस्थांना यश आले असले तरी घरासह किराणा दुकान पूर्णत: भस्मसात झाल्याने महाले कुटुंबियांचे लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

भटू महाले यांचे घर व किराणा दुकान एकत्रच आहे. गॅसवर चहा ठेवत असताना शेगडीला लायटर लावताच आग लागली. गॅस लिक झालेला असल्याने काही क्षणातच घरासह दुकानानेदेखील पेट घेतला. संसारोपयोगी वस्तूंसह अन्नधान्य, कपडे, किराणा दुकानातील साहित्य तसेच बँकेकडून घेतलेले कर्जाचे तीन लाख व दुकानाचे दोन लाख अशी पाच लाखांची रोकड ठेवलेल्या कपाटासदेखील आगीच्या ज्वाळांनी वेढले होते. कागदपत्रांसह रोकड वाचावी यासाठी महाले दाम्पत्याने प्रयत्न केले असता आगीच्या ज्वाळांनी हे दाम्पत्यदेखील भाजले.

घरातून आगीच्या ज्वाळा तसेच धूर बाहेर पडत असल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी घराकडे धाव घेत गंभीररीत्या भाजलेल्या भटू महाले व लता महाले यांना घराबाहेर काढत आग विझवण्यास प्रारंभ केला. सरपंच गंगूबाई अहिरे, पोलीसपाटील तुकाराम महाले यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी अग्नी उपद्रवाची नोंद केली आहे. घरासह किराणा दुकानातील संपूर्ण साहित्य जळून भस्मसात झाल्याने महाले दाम्पत्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. गॅस गळतीमुळेच ही आग लागली असल्याने शासनाने महाले कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com