शेतकरी हा करोना योद्धा

शेतकरी हा करोना योद्धा
शेतकरी

नाशिक | विजय गिते | Nashik

शेतकरी (Farmer) उभ्या जगाचा पोशिंदा आहे, असे म्हटले जाते. करोनाकाळात (Corona) खचून न जाता या शेतकर्‍यांनी जगाचा पोशिंदा हे ब्रीद खरे करून दाखवत आपणही खरे करोना योद्धा आहोत हे जगासमोर सिद्ध केलेय. संपूर्ण जग करोना महामारीमुळे बंद असताना शेतकरी मात्र आपल्या शेतात राबत होता. ते फक्त जगासाठी. त्याला भीती वाटत नसेल का? नक्कीच वाटत असेल, पण जसे करोनामुळे जग थांबले तसाच शेतकरी जर थांबला असता तर जग उपाशी राहिले असते. त्यामुळे शेतकरीसुद्धा करोना योद्धाच आहे...

करोनाने भारतात (India) एन्ट्री केली आणि संपूर्ण देश थांबला. पंतप्रधान, मुख्यमंत्री लाईव्ह येत होते. सतत सूचना देत होते. काय बंद अन् काय सुरू राहील सांगत होते. काही अत्यावश्यक सेवा सोडून संपूर्ण देश थांबला होता. पण शेतकरी मात्र थांबला नव्हता.

कोणी आपल्या शेतातील पिके काढत होते, तर कोणी आपल्या शेताची मशागत करत होते. त्यांचे ध्येय एकच ते म्हणजे आपल्या सोबत जगाचे पोट भरले पाहिजे. लॉकडाऊनमध्ये (Lockdown) तुम्ही चैनीच्या वस्तू सोडून जगला असाल. पण अन्नाशिवाय तुम्ही जगू शकतच नाही. लॉकडाऊनच्या काळात तर मजुरांची टंचाईही मोठी. त्यातून मार्ग काढत अनेक शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील माल कसाबसा काढला.

एवढेच नव्हे तर पिकवलेला भाजीपाला (Vegetables) मोफत वाटला. आपल्या शेतात राबराब राबून पिकवलेले सोने त्याने मोफत दिले आणि हो हे फक्त शेतकरीच करू शकतो. शेतकर्‍यांप्रती राजकीय दृष्टिकोन जरी बदलला नसला तरी शेतकरी नेहमी समाजाचेच हित पाहत आलाय आणि पाहणार. कोणतेही सरकार असो सरकारच्या घोषणा शेतकर्‍यांसाठी पोकळच ठरल्या. सरसकट कर्जमाफी कागदावरच राहिली.

नियमित कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ झालाच नाही. हे संतापजनक असतानाच करोनासारख्या कठीण परिस्थितीत बँकेतील अधिकारी शेतकर्‍यांच्या घरी जात होते अन् वसुली करत होते. जुने कर्ज परतफेड केल्याशिवाय नवीन कर्ज नाही, असे ठाम सांगत आहेत. सुलतानी संकटाबरोबरच दरम्यानच्या काळात आलेल्या ‘निसर्ग’ वादळाने तर शेतकर्‍यांच्या अडचणीत आणखी वाढ केली. कांदा, गहू, गुरांचा चारा या पिकांची नासधूस करून वादळ परत गेले. हीच परिस्थिती द्राक्ष, केळी, भाजीपाला उत्पादक आणि फळ उत्पादकांची झाली.

लॉकडाऊनमध्ये ही पिके मातीमोल भावात विकावी लागली. काही शेतमाल तर फेकून द्यावा लागला तर काही शेतातच सोडून द्यावा लागला. लॉकडाऊनसारखे अनपेक्षित संकट आ वासून शेतकर्‍यांच्या पाचवीला पुजल्याचीच भावना शेतकर्‍यांमध्ये होती. जवळ जवळ 73 वर्षे झाली भारत स्वातंत्र होऊन. पण शेतकरी मात्र सुखी झालेला नाही. स्वातंत्र्यानंतर 52 टक्के मुख्य व्यवसाय शेती हा होता. अन्य कोणता उद्योग अस्तित्वात नव्हता.

त्यामुळे शेती (Agriculture) प्रमुख व्यवसाय होता. तसेच तेव्हा भूक हा मोठा प्रश्न होता. तो सोडवण्यात शेतकर्‍यांचा मोठा वाटा. पण आज तोच शेतकरी गरीब आहे. आधुनिक युगात शेतकरी त्याच्या शेतीतच गुंतून आहे. आज सरकार विविध योजनांचा गाजावाजा करते. पण वास्तविक चित्र मात्र वेगळेच आहे.

आज शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव नाही. जो आहे त्यातही दलालांची भागीदारी. त्याच्या मालाला भाव असतो पण पीक शेतात असते तेव्हा. एकदा का पीक शेताच्या बाहेर आले की भाव जमिनीवरच पडतात. करोनाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती लॉकडाऊनने लॉक करून टाकली आहे.

Related Stories

No stories found.