
ओझे | विलास ढाकणे | Oze
दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) द्राक्ष उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून नैसर्गिक आपत्तीचा सामना करित असून सतत होणाऱ्या हवामान बदलाचा फटका द्राक्षबागांना बसत असून उत्पादनात मोठ्या प्रमाणावर होणारी घट लक्षात घेता सध्या शेतकरी कमी खर्चात कोणते पिक घेता येईल या दृष्टीने विचार करीत आहे...
करंजवण येथील प्रयोगशील शेतकरी समाधान जाधव (Samadhan Jadhav) यांनी त्यांची दोन एकर द्राक्षबागेला कुऱ्हाड लावून डांगर लागवडीला पसंती दिली आहे. समाधान जाधव यांनी यंदाच्या हंगामात दोन एकर द्राक्षबागेची ऑक्टोबर महिन्यात छाटणी केली होती. मात्र द्राक्षवेलीवर समाधानकारक घड न निघाल्यामुळे द्राक्षबाग तोडण्याचा निर्णय घेतला.
द्राक्षबाग तोडल्यानंतर कुठल्याही प्रकारची मशागत न करता द्राक्षवेलीची खुटके ट्रॅक्टरने काढून घेतली व त्यांच द्राक्षवेलीच्या ठिकाणी डांगराचे बियाणे टोकण पद्धतीने लावण्यात आले त्यांत द्राक्ष बागेत पहिलेच ठिबक सिंचन असल्यामुळे तो ही खर्च करण्याची वेळ आली नाही.
साधारणपणे दोन एकरात चार हजार डांगर बियाण्याची टोकन पध्दतीने लागवड करण्यात येवून एका ठिकाणी दोन बियांची लागवड करण्यात आली आहे. दोन सरीमधील अंतर नऊ फूट असून सहा फुटावर लागवड करण्यात आल्यामुळे डांगराची वेल जमिनीवर पसरण्यास कुठलाही अडथळा निर्माण होत नाही.
परिणामी वेलीची वाढ अतिशय जोमदार होऊन फलधारणा चांगली होते. द्राक्षबागेला प्रत्येक वर्षी टाकलेले शेण खत, रासायनिक खत व जैविक खते यामुळे सध्या डांगर वेलेची वाढ जोमदार होत असून लागवड करून ४५ दिवस झाले आहे.
फलाचा बहार चांगला असून साधारणतः ८० ते ९० दिवसांत डांगर तोडणीला येतील साधारणपणे एका ठिकाणी लावलेल्या दोन वेलीपासून कमीत कमी १५० किलो माल मिळतो. हा माल नशिक मार्केटमध्ये कमीत कमी १० रुपये प्रतिकिलोने विकला जातो. महत्वाचे म्हणजे डांगर तोडणीनंतर हा माल दोन महिन्यापर्यंत साठविता येत असून बाजार भावानुसार विक्री करता येते.
आम्ही गेल्या वीस वर्षांपासून डांगर लागवड करीत असून अतिशय कमी खर्च तसेच हे पिक रोगाला बळी नसून फवारणीचा खर्चही अत्यल्प आहे. वातावरण बदलाचा खूप गंभीर परिणाम डांगर पिकावर होत नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये हवामान बदलाचा अंदाज घेऊन शेतकरी वर्गाने कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल अशा पिकाची लागवड केली पाहिजे. सध्या द्राक्ष उत्पादक बाजार भाव व नैसर्गिक आपत्ती यामुळे बेजार झाला असून यासाठी शेतकरी वर्गाने विविध प्रकारच्या वेलवर्णीय व कमी खर्चाच्या पिकाकडे वळणे ही काळाची गरज आहे.
- समाधान जाधव, शेतकरी, करंजवण.