दिवाळीवर करोना, अतिवृष्टीचा परिणाम

दिवाळीवर करोना, अतिवृष्टीचा परिणाम

मनमाड | बब्बू शेख | Manmad

दिन-दिन दिवाळी (Diwali) म्हणत आजपासून साजर्‍या होत असलेल्या दिवाळी सणावर मनमाड शहरासोबत संपूर्ण नांदगाव (Nandgaon) तालुक्यात करोना (Corona), अतिवृष्टी (Heavy Rain) आणि वाढती महागाई यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे सावट दिसून येत आहे...

सलग झालेल्या अतिवृष्टीचा फटका पिकांना बसून खरिपाचा हंगाम हातातून गेल्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची? असा प्रश्न शेतकर्‍यांसह ग्रामीण भागातील जनतेला पडला आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी, दुकानदारांनी माल भरून ठेवल्यामुळे बाजारपेठ तर सजलेली आहे, मात्र खरेदीसाठी ग्राहक येत नसल्यामुळे कापड, किराणा, फराळ यासह इतर दुकानदार व व्यापार्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होऊन ते हवालदिल झाले असल्याचे चित्र दिसून आले.

दिवाळी सर्वात मोठा सण असल्यामुळे गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच जण तो आपापल्या परीने उत्साहाच्या वातावरणात साजरा करतात. ग्रामीण भागात तर एक महिना अगोदर दिवाळीची तयारी करण्याची परंपरा असून घराला रंगरंगोटी करण्यापासून फराळ तयार करणे, त्यानंतर नवीन कपडे, फटाके, रांगोळी, आकाशकंदील, पणत्या आदी खरेदीची लगबग सुरू होते. मनमाड शहराला खेटून अनेक छोटी-मोठी गावे असल्याने या शहराची आर्थिक उलाढाल ही ग्रामीण भागातील नागरिक व शेतकर्‍यांवर जास्त अवलंबून आहे.

दिवाळीच्या वेळी शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाजारपेठेत येत असल्यामुळे यंदाही व्यापार्‍यांनी किराणा, कापड, फराळ, आकाशकंदील, पणत्या यासह इतर साहित्य विक्रीची दुकाने थाटली आहेत. परंतु करोना संकट व अतिवृष्टी आणि इंधनासह इतर वस्तूंच्या वाढलेल्या किमती आदीचे सावट दिवाळीच्या खरेदीवर प्रामुख्याने दिसून येत आहे.

दिवाळी सुरू होण्याअगोदर बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडायची परंतु आजपासून दिवाळी सुरू झाल्यानंतरदेखील बाजारपेठेत पाहिजे तेवढे ग्राहक येत नसल्याचे पाहून व्यापार्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीसारख्या सणाच्या वेळी इतकी मंदी आम्ही कधीच पहिली नसल्याचे दुकानदार-व्यापारी सांगत आहेत.

करोनाने सर्व सण-उत्सवांवर निर्बंध आणले होते. मात्र सध्या करोना आटोक्यात आल्यामुळे शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतील असे वाटत होते. मात्र अतिवृष्टीने पिके हातातून गेल्यामुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.

महागाईमुळे गोरगरीब, मध्यमवर्गीयांवर आर्थिक संकट आले आहे. शासकीय नोकरदार यांना नियमितपणे पगार सुरू असून त्यांना महगाई भत्ता, बोनसदेखील मिळाल्यामुळे त्यांची दिवाळी व्यवस्थित होत आहे. मात्र तेदेखील हात राखून खर्च करताना दिसत असल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com