घराचे स्वप्न होणार साकार; म्हाडातर्फे लॅण्ड बँकेचा निर्धार

घराचे स्वप्न होणार साकार; म्हाडातर्फे लॅण्ड बँकेचा निर्धार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

म्हाडाने (MHADA) गेल्या 30 ते 35 वर्षांपूर्वी ज्या जमिनी घेतल्या होत्या. त्यावर आतापर्यंत घरे बांधली, ती विकली. आता पुन्हा 30 ते 35 वर्ष घरांचे स्वप्न साकार करावयाचे असेल तर तेवढ्या प्रमाणात जमीन नाही. म्हणूनच आता लॅण्ड बँक (Land Bank) करण्याचा निर्धार करण्यात आला आहे...

म्हाडा आता मोठ्या प्रमाणावर जमिनी घेऊन भविष्याची तरतूद करणार आहे. पुढील 20 वर्षात विकसित होणार्‍या भुभागाचा विचार करुन तेथील जमीन खरेदी करुन म्हाडा आता आपली लॅण्ड बँक समृध्द करणार आहे, अशी माहिती म्हाडाचे सभापती शिवाजीराव ढवळे (Shivajirao Dhawale) यांनी देशदूतशी बोलताना दिली.

ढवळे म्हणाले की, नाशिकमध्ये म्हाडाने घरांच्या किमती 40 टक्क्यांनी घटवून सामान्यांचे घरचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर परवडणाऱ्या किमतीत मिळावे, यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणने (म्हाडा) नाशिकमध्ये 992 सदनिका सध्या विक्रीसाठी आहेत.

म्हाडाच्या नाशिक विभागीय कार्यालयातर्फे सध्या आडगाव, पाथर्डी, मखमलाबाद, पंचक, म्हसरूळ, सातपूर येथील 816 घरांची विक्री सुरू आहे. आडगाव येथे सर्वाधिक 393 घरे आहेत. पाथर्डीत 208, मखमलाबाद 106, पंचक 146, म्हसरूळ 56 व सातपूरला 80 घरे आहेत. सातपूर वगळता इतर ठिकाणची घरे तयार आहेत.

म्हाडाकडे अर्ज सादर करणाऱ्यांना म्हाडाच्या नियमानुसार घर मिळाल्याचे जाहीर केल्यानंतर संबंधितांनी संपूर्ण रक्कम भरल्यास त्यांना ताबडतोब ताबा मिळू शकणार आहे. आडगाव, खुटवडनगर येथील घरे लहान आकाराची आहेत, तर पाथर्डी येथील घरे सर्वांत मोठी आहेत. आडगाव येथील 458 चौरस फूट बिल्टअप क्षेत्र असलेल्या घराची किंमत दहा लाख 50 हजार आहे.

पाथर्डी येथील 1164 चौरस फूट बिल्टअप क्षेत्र असलेल्या घराची किंमत 37 लाख रुपये आहे. म्हाडा कोणताही नफा कमवत नाही, त्यामुळे जादा दराने घरे विक्रीचा प्रश्नच उद्भभवत नाही, असे सभापती शिवाजीराव ढवळे यांनी सांगितले.

बांधकामाचा आणि अस्थापनाचा खर्च मिळून घराची किंमत निश्चित केली आहे. म्हाडाने सातपूर कामगार वसाहतीत आतापर्यंत अडीच हजार जणांचे घरांचे स्वप्न साकार केले आहे. आतापर्यंत लॉटरी पध्दतीनेच घरे दिली जात होती.

आता मात्र विविध घटकांसाठी राखीव ठेवतांनाच 50 टक्के घरे प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्वावर दिली जाणार आहे. त्यामुळे जे गरजू आहेत. त्यांना आता सोडतीची प्रतीक्षा करावी लागणार नाही. सध्या करोनामुळे (Corona) मागणी कमी असली तरी आगामी काळात ही घरे गेल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ढवळे यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com