भाजीपाल्याचे मागणी-पुरवठा सूत्र जमेना

आवक 30 ते 40 टक्के; दर गगनाला भिडले
भाजीपाल्याचे मागणी-पुरवठा सूत्र जमेना

नाशिक । सोमनाथ ताकवाले Nashik

सलग 20 ते 22 दिवस झालेल्या पावसाने ( Rain )भाजीपाला( Vegetables ) आणि फळभाज्यांचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात उत्पादन घटले आहे. नाशिकसह परपेठेतून असलेली मागणी बाजार समितीत होणार्‍या अत्यल्प आवकेने पूर्ण होत नसल्याने भाजीपाल्याचे दर अडीच पटीने वाढले आहेत.

मागणी-पुरवठा हे सूत्र विस्कळीत झाल्याने कोबी, फ्लॉवर, वांगी, गवार, सिमला, कारले, दोडके, गिलके, शेवगा, काकडी या फळभाज्यांसह मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू, कांदापात या पालेभाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढलेे आहेत. त्यामुळे झालेल्या महागाईने ग्राहकांंच्या नाकी नऊ आले आहे.

नाशिक बाजार समितीत आवक अवघी 30 ते 40 टक्के होत आहे. खरेदीदारांचे प्रमाण अधिक असल्याने आणि त्यातहीमुंबईसह गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर परपेठांमध्ये नाशिकच्या भाजीपाल्याला मागणी अधिक आहे. त्यामुळे मार्केटमध्ये लिलावात व्यापार्‍यांची चढाओढ आहे, तर स्थानिक भाजीबाजारातील विके्रत्यांमध्ये खरेदीची स्पर्धा आहे.

पावसाने मालाची प्रतवारी, परिपक्वता आणि टिकवण क्षमता सुमार दर्जाची झालेली असली तरी हा माल भाव खावून जात आहे. असे असले तरी शेतकर्‍यांना शिवारात मालाच्या झालेल्या नासाडीमुळे तेजीचा फार काही लाभ होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. कारण शिवारात अधिक काळ पावसाचे पाणी तुंबून राहिल्याने भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.

भर पावसात तयार शेतमाल मजुरांअभावी काढता आला नव्हता. त्याचबरोबर पावसाने अधिक झोडपल्याने त्याची परिपक्वताही अधिक झाल्याने दर्जावर परिणाम होऊन हा माल विक्री योग्यही राहिला नसल्याचे शेतकर्‍यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. नाशिक बाजार समितीच्या जुन्या आवारात सकाळ-दुपार- संध्याकाळ आणि रात्र सत्रात येणारा भाजीपाला सध्या सकाळी आणि दुपारी अल्प प्रमाणात येत आहे. त्यातही कळवण, दिंडोरी, नाशिक, पेठ आदी तालुक्यांत मुसळधारेने कारले, भोपळा, दोडके, गिलके, काकडी या वेलवर्गीय भाज्यांच्या वेलांचे देठ सडले. त्यामुळे उत्पादकांचे नुकसाने झाले आहे. त्याचबरोबर कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक या पालेभाज्यांना अतिरिक्त पाणी मिळाले त्याचा विपरीत परिणाम वाढीवर झाला. तसेच त्या शिवारात कुजल्या आहेत. त्यामुळे काढणी योग्य माल वाया गेला आहे.

नाशिकमध्ये भेंडी, दोडके, वांगी, गाजर, आद्रक, मिरची, डांगर, शेवगा हा दुसर्‍या बाजारपेठातून व्यापारी आणत असून त्याचा वाहतूक खर्च, मार्केट शुल्क, हमाली, तोलई आणि नफा विचारात घेता स्थानिक दर अधिक प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडे भाजीपाला किमान शंभर रुपये किलो दराने विक्री होत आहे. भाजीपाल्यांचे दर एवढे वाढल्याने महिलांचे घरखर्चाचे नियोजन कोलमडले आहे. तर भाजीपाल्यापेक्षा कडधान्यांचा वापर केलेला बरा, असा सूर व्यक्त होत आहे.

कोथिंबिर तेजीतच

पावसाने पालेभाज्यांचे दर तेजीत येण्याचे निमित्त झाले असले तरी, कोथिंबिर पूर्वीपासून लिलावात तेजीत विक्री होत आहे. प्रतवारीनुसार छानी आणि गावठ कोथिबिरचे दर 4 ते 16 हजार रूपये प्रतिशेकडा जुडीपर्यंत गेलेले आहेत. आवक नसल्याने लिलावात येणार्‍या पालेभाज्या भाव खात आहे.

राजू आंंधळे, आई जगदंबा व्हिजिटेबल कंपनी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com