लेखापरीक्षक नेमण्याचा निर्णय दिलासादायक

लेखापरीक्षक नेमण्याचा निर्णय दिलासादायक
USER

नाशिक । प्रतिनिधी

शहरातील खासगी रुग्णालयांची तपासणी करून सुमारे 20 हजार 762 बिलांची तपासणी लेखापरीक्षकांमार्फत करण्यात आली. या तपासणीमुळे 4 कोटी 86 लाख 73 हजार 278 रुपयांचे बिल कमी करण्यात यश आले आहे. खासगी रुग्णालयांच्या अनागोंदी कारभाराला पायबंद घालण्यासाठी लेखापरीक्षक नेमण्याचा महापालिकेचा निर्णय रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांसाठी दिलासादायक ठरत आहे.

सद्य:स्थितीत सुमारे 27 हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण नाशिकमध्ये उपचार घेत आहेत. दररोज हजारोंच्या संख्येने नवीन रुग्ण आढळत असल्याने महापालिकेसह खासगी रुग्णालये रुग्णांच्या गर्दीने फुल्ल झाली असून, नवीन बाधितांसाठी आता बेड मिळणे दुरापास्त झाल्याने शहरात भयावह परिस्थिती आहे. यावर मात करण्यासाठी महापालिका, तसे जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

अशातच खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधित व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट केली जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्याने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी खासगी रुग्णालयांतील बिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लेखापरीक्षक नेमण्याचा निर्णय घेतला. शहरातील 134 खासगी रुग्णालयांमध्ये बिलांच्या तपासणीसाठी लेखापरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांच्या या निर्णयानंतर खासगी रुग्णालयांकडून केली जाणारी रुग्णांची लूट बहुतांश थांबली आहे. या लेखापरीक्षकांमार्फत आतापर्यंत 20 हजार 762 बिलांची तपासणी करण्यात आली असून, रुग्णांकडून अतिरिक्त आकारले जाणारे तब्बल 4 कोटी 86 लाख 73 हजार 78 रुपये कमी करून रुग्णांची होणारी आर्थिक लूट रोखण्यात महापालिकेला यश आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com