महानोर यांचे निधन मनाला चटका लावणारे

मान्यवरांच्या भावना; निसर्गकवीला श्रद्धांजली
महानोर यांचे निधन मनाला चटका लावणारे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सुप्रसिद्ध ’रानकवी’, गीतकार, शेतकरी व माजी आमदार नामदेव धोंडो महानोर यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. महानोर यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी भावना व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

कुटुंबियांच्या दुःखात सहभागी

‘रानकवी’ अशी ओळख असणारे ज्येष्ठ कवी, गीतकार व विधानपरिषदेचे माजी सदस्य ना. धों. महानोर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! हाडाचे शेतकरी असलेल्या महानोरांनी आपल्या शब्दांतून अनेक पिढ्यांना रानाची, निसर्गाची सफर घडवली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

- छगन भुजबळ, मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

कारकीर्द अजरामर राहील

प्रसिद्ध साहित्यिक निसर्गकवी ना. धों. महानोर यांचे निधन झाल्याची बातमी मनाला चटका लावणारी आहे. साहित्य वैभवात मोलाची कामगिरी त्यांची अजरामर राहील. महानोर यांनी मराठीच्या बोलीभाषांचा वापर करून भाषेचे ग्रामीण महत्व पटवून दिले. त्यांच्या कवितांनी बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ’पळसखेडची गाणी म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना आहे. त्यांच लिखाण हे निसर्गाशी नाते जोडणारे होते. त्यांच्या कवितेतून निसर्ग बोलायचा इतकं सुंदर त्यांच्या गीतांचे बोल आहेत. ‘मी रात टाकली..मी कात टाकली’ ही त्यांच्या लोकप्रिय गीतांपैकीच एक रचना अतिशय लोकप्रिय झाली. त्यांचा ‘रानातल्या कविता’ हा कवितासंग्रह देखील खूप गाजला. स्वत: शेतकरी असल्याने निसर्ग, शेतीविषयी असलेलं प्रेम त्यांच्या कवितेतून झळकायचे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

- दादा भुसे,पालकमंत्री, नाशिक

मराठी कवितेची लय हरवली..

ज्यांनी मराठी ग्रामीण कविता लोकाभिमुख केली. ग्रामीण कवितेला स्वतःची चाल व लय दिली. ते आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक ज्येष्ठ कवी ना. धो.ं महानोरदादा यांच्या दुःखद निधनाने मराठी साहित्याची न भरून निघणारी हानी झाली आहे. यशवंतरावांनी दादांना खांद्यावर घेतले व त्यांनी त्याचा उपयोग मराठी कविता मराठी मनात रुजवण्यासाठी केला. दादा कवितेने आमच्यात जिवंत आहे. मराठी भाषा महानोर दादांना कधी विसरणार नाही. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.

- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना

ज्ञान देणारा आदर्श शेतकरी

मोठ्या मनाचा कवी, खडकाळ जागेतही शेती कशी करावी, याचे ज्ञान देणारा आदर्श शेतकरी, दोन वर्षे वेळा आमदार ठरलेला मोठ्या मनाच्या कवी हृदयाचा वेल्हाळ व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरवला आहे. गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने रुग्णालयात उपचार करत होते. खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना मुंबईला आणले. त्यांच्या कवितांना योग्य व्यासपीठ दिले. निसर्गाची एकरूप असलेला हा अतिशय साधा कवी हरपला आहे. जैत रे जैत सारखे अनेक चित्रपटगीत त्यांनी लिहिले. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकरांचेही त्यांचे जवळचे संबंध होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे ते विश्वस्त म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. राज्यातला मोठा निसर्ग कवी आज हरपला आहे.

- हेमंत टकले, माजी आमदार

रानातलं आभाळ पोरकं

दादा जिंदादिल व्यक्तिमत्व होते. अखेरपर्यंत त्यांनी हिंमत सोडलेली नव्हती. मात्र वहिनी गेल्यानंतर काही अंशाने खचले होते. समाजातील दोन ते तीन पिढ्या त्यांनी कवितेने समृद्ध केलेल्या आहेत. निसर्ग कवीची भाषा बदलून त्यांनी समाजाला नवी भाषा दिली. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या मळ्यामध्ये आम्ही ‘सुलोचनाच्या पाऊलखुणा’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन केले होते. वहिनींच्या आठवणींना उजाळा देणारा काव्यसंग्रह आहे. शेती, माती, निसर्ग, चैतन्यमय करून समाजाला काव्य संस्कार दिले. बालकवी नंतर निसर्गाबद्दलची कवितेची भाषा समजावून सांगणारा एक उदंड व्यक्तिमत्व आज लयास गेला आहे. रानातलं हे आभाळ आज आपल्याला पोरके करून गेला आहे.

- प्रकाश होळकर, कवी

लिहित्या हातांचा संवेदनशील मार्गदर्शक

कविवर्य ना.धों.महानोर म्हणजे नव्याने लेखन करणार्‍या खेड्यापाड्यातील लिहित्या हातांचा संवेदनशील मार्गदर्शक, दादांनी ग्रामजीवनातील अस्वस्थ जगणं आपल्या रचनांतून प्राधान्याने मांडले. उत्कट निसर्गकविता दादांच्या जाण्याने पोरकी झाली आहे.

- रवींद्र मालुंजकर, कवी, नाशिकरोड

नादशील कवितांना मुकलो

ना.धों.महानोर दादा हे महाराष्ट्राला मोठे कवी, गीतकार म्हणून सर्वदूर परिचित होते. त्यांच्यातील संवेदनशील माणूसपणही अवघ्यांनी अनुभवले आहे. आमच्या पिढीला त्यांनी सकस कवितेचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष धडे दिले आहेत. त्यांच्या जाण्याने नादशील कवितेच्या एका स्वतंत्र दालनाला आपण मुकलो आहोत. दादांना मनस्वी आदरांजली.

- प्रा. गंगाधर अहिरे, नाशिक

अजंठाचा बोलका आवाज हरपला

दादांचे महाराष्ट्राच्या साहित्यात मोठे योगदान होते. साहित्याच्या पलीकडच्या अजंठाची त्यांनी ओळख करून दिली. खूप काळ त्यांच्या सोबत घालवला. त्यांच्या जाण्याने अजंठाचा बोलका आवाज हरपला. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली

- प्रसाद पवार, आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर रिस्टरेशन आर्टिस्ट

हिरवाकंच वटवृक्ष कोसळला...

रानकवी - निसर्गकवी पद्मश्री ना.धों.महानोर यांचे जाणे म्हणजे साहित्यातील हिरवाकंच वटवृक्ष कोसळला आहे. आमच्यासारख्या लिहित्या हाताना बळ देण्याचा सतत त्यांचा प्रयत्न होता. मातीशी आणि कवितेशी घट्ट नाळ जोडलेले दादांचे काम हे प्रत्येकाला सावली देत होते आणि म्हणूनच आज नवोदितांसह सर्वच साहित्यिक या सावलीला पोरके झालो आहोत. दादांसोबतच्या खूप छान आठवणी आहेत. निफाडच्या मातीशी त्याचे एक वेगळे नातंं होते. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.

- राजेंद्र सोमवंशी, कवी,

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com