नाशिक । प्रतिनिधी Nashik

वरुणराजाने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये केलेल्या आभाळमायामुळे जिल्ह्यातील 18 धरणे शंभर टक्के भरली असून ओव्हर फ्लो झाली आहेत.

जिल्ह्यातील 24 धरणांत मिळून 96 टक्के इतका मुबलक जलसाठा आहे. गतवर्षी आजमितीला धरणांत 99 टक्के जलसाठा होता. साधारणत: पावसाचा मुख्य हंगाम संपला असून येत्या 15 ऑक्टोबरपासून परतीचा पाऊस सुरु होईल. ते बघता लवकरच सर्व धरणे शंभर टक्के भरण्याची चिन्हे आहेत. एकूण जलसाठा बघता किमान वर्षभरासाठीचा जिल्ह्याचा पिण्याचा व शेतीसाठी आवर्तनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

नाशिक महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणार्या गंगापूर व दारणा समुह धरणातून दररोज साधारण 18.5 दश लक्ष घन फुट इतका पाणी पुरवठा केला जातो. यात 70 ते 80 टक्के भागाला गंगापूर समुह (गंगापूर, गौतमी व कश्यपी)धरणातून गंगापूर थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो. या धरण समुहात आज (दि.4) सकाळी 6 वाजेपपर्यत 87.24टक्के (8643 दश लक्ष घन फुट) इतका जलसाठा नोंदविला गेला आहे.

मागील वर्षी ऑगस्ट अखेरीस 99 टक्के इतका जलसाठा नोंदविला गेला होता. यंदा धरण पाणलोट क्षेत्रात अर्थात नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पहिल्या टप्प्यात पुरेशा पाऊस झाला नाही. ऑगस्टच्या तिसर्या व चौथ्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. नंतर सप्टेंबर महिन्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. यामुळे आजमितीस गंगापूर धरणातील जलसाठा 100 टक्के इतका साठा झाला आहे.

तसेच कश्यपी व गौतमी धरणातील साठा अनुक्रमे 75 व 86 टक्के झाला आहे. गंगापूर धरण भरले असले तरी वरच्या भागात असलेल्या समुहातील गौतमी व कश्यपी धरण भरण्यास अजुनही सुमारे 14 व 25 टक्के इतका साठा पाणीसाठा हवा आहे.

जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणांतील जलसाठ्यात दमदार वाढ झाली. सप्टेंबरमध्येही वरुणराजाने जोरदार हजेरी कायम ठेवली आहे. त्यामुळे धरणे तुडूंब भरली आहे. जिल्ह्यातील 24 धरणांमध्ये 96 टक्के जलसाठा आहे. गंगापूर, दारणा, मुकणे, गिरणा यांसह 18 मोठी व मध्यम क्षमतेची धरणे शंभर टक्के भरुन ओव्हर फ्लो झाली आहेत.

दारणा, गिरणा व नांदूरमध्यमेश्वर बंधार्यातून मोठया प्रमाणात विसर्ग सुरु आहे. धरणांची एकूण पाणी क्षमता 65 टीएमसी असून सद्यस्थितीत 62 टिएमसी इतका जलसाठा आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसात परतीच्या पावसाला सुरुवात होईल असा इशारा दिला आहे. पावसाची हजेरी कायम राहिल्यास धरणे शंभर टक्के भरतील. गतवर्षी आजमितिस धरणांत 99 टक्के जलसाठा होता.