लासलगाव । हारून शेख

करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशासह विदेशात लॉकडाउन असतानासुद्धा भारतातून एप्रिल ते 14 सप्टेंबर 2020 या कांद्याची 13 लाख 06 हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे.

कांदा निर्यातीतून 2,091 कोटी रूपयांची उलाढाल होऊन करोना काळात देशाला परकीय चलन मिळाले. साडेतीन महिन्यांच्या निर्यातबंदीनंतर चालू आर्थिक वर्षात 3 महिन्यांचा कालावधी उरला आहे. आता कांदा निर्यात पुन्हा खुली झाल्याने सन 2018-19 च्या आर्थिक वर्षाची निर्यातीची आकडेवारी पार केली जाण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली.

गेल्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव असतानाही कांदा निर्यातीत भरघोस वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या उन्हाळ कांद्याच्या हंगामात 130 टक्के बंपर उत्पादन झाले होते. त्यामुळे मागणीच्या तुलनेत कांद्याचा अधिक पुरवठा देशा-विदेशात होत असल्याने कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले होते.

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन दिल्याने सन 2020-21 या आर्थिक वर्षात एप्रिल ते 14 सप्टेंबरपर्यंत 13 लाख 6 हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली होती. त्यातून 2,091 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे.

यंदा लॉकडाऊनच्या काळात कृषी क्षेत्रातील निर्यात 43.3 टक्क्यांनी वाढ झाल्याने केंद्र सरकारला परकीय चलन मिळण्यास मोठी मदत झाली आहे. यामुळे केंद्र सरकारने आयात-निर्यात धोरणात बदल करताना या गोष्टींचाही विचार करावा, असे मत नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

वर्षनिहाय निर्यात

2018-19 - 21 लाख 84 हजार मेट्रिक टन - 3,469 कोटी

2019-20 - 11 लाख 50 हजार मेट्रिक टन - 2,321 कोटी

2020-21 - 13 लाख 06 हजार मेट्रिक टन - 2,091 कोटी (एप्रिल ते 14 सप्टेंबरपर्यंत)