स्मारककामाची समितीकडून चौकशी सुरू

साहित्य नमुने अधिकार्‍यांच्या ताब्यात; प्रारूप आराखड्याची मागणी
स्मारककामाची समितीकडून चौकशी सुरू

सटाणा । प्रतिनिधी Satana

शहरातील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारकाच्या ( Shri Yashwantrao Maharaj Memorial)निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर त्रयस्थ लेखापरीक्षण करण्याकरता शासकीय तंत्रनिकेतन सामनगाव (नाशिक) येथील अधिकार्‍यांच्या समितीने काल स्मारकाची पाहणी करत काही वस्तूंचे नमुने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत.

दरम्यान, उपरोक्त विषयासंदर्भात येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सोनवणे यांनी नगरपालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर चार दिवस आमरण उपोषणही केले होते. याअनुषंगाने पालिका प्रशासनाने त्रयस्थ संस्थेमार्फत स्मारकाच्या कामाचे लेखापरीक्षण करण्यासंदर्भात कार्यवाही केलेली होती.

देवमामलेदार यशवंतराव महाराज सटाणा शहरात मामलेदार म्हणून कार्यरत असताना असलेल्या तत्कालीन शासकीय तहसील कचेरीचे जतन करून महाराजांचे स्मारक करण्यात यावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी शासनाकडे केली होती.

त्याअनुषंगाने शासनाच्या पर्यटन विकास विभागामार्फत 4 कोटी 75 लाख रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे. पालिका प्रशासनाच्या नियंत्रणाखाली सदरचे काम मार्गी लावण्यात येणार आहे. दरम्यान, स्मारकाच्या कामाचा ठेका धुळे येथील इशिता इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आला आहे.

मात्र सुरुवातीलाच केलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून प्रत्यक्षात दोन ते तीन लाखांचे काम झालेले असताना 16 लाख रुपयांचे बिल काढण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्ते मनोज सोनवणे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर काल सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेतनचे आर. वाय. पाटील व इतर दोन अधिकार्‍यांनी सदर स्मारकाच्या कामाची बारकाईने पाहणी करत काही वस्तूंचे नमुने चौकशीकरता ताब्यात घेतले आहेत.

त्यात बदललेली काही कौले, रंग दिलेली कौले, लाकडी बल्ल्या व सिमेंटचे प्लास्टर यांचा समावेश आहे. यावेळी देवमामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, श्रीधर कोठावदे, ट्रस्टचे विश्वस्त रमेश सोनवणे, हेमंत सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, माजी आमदार संजय चव्हाण, नितीन सोनवणे, राजेंद्र सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, किशोर कदम, नाना कुमावत, श्रीनिवास कुलकर्णी, रोहित जाधव, मुन्ना शेख, यशवंत सोनवणे, सुनील खैरनार पालिकेचे मुख्याधिकारी नितीन बागुल, विजय देवरे, माणिक वानखेडे, अभियंता मोरे, जोशी आदी उपस्थित होते.

दरम्यान, ठेकेदाराची नेमणूक न करताच स्मारकाचे काम सुरू करण्यात आले असून प्राचीन तहसील कचेरीचा प्रारूप आराखडा उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. पालिका प्रशासनाने सदरचा प्रारूप आराखडा उपलब्ध करून द्यावा, असे समितीच्या अधिकार्‍यांनी सूचित केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com