मकरसंक्रांतीसाठी शहर सज्ज

मकरसंक्रांतीसाठी शहर सज्ज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शुक्रवारी साजर्‍या होणार्‍या मकरसंक्रांतीसाठी Makarsankranti Festival शहर सज्ज झाले आहे. आज( ता. 13) महिलांंंंचा भोगीचा सण Bhogi Festival आहे. उद्या संक्रांतीच्या तिळगुळापासून सुरुवात होईल. दुपारी पतंगोत्सव, त्यानंतर महिलांंचा हळदी कुंकू असे विविध कार्यक्रमांंची रेलचेल या निमित्ताने सात फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. मकरसंक्रांतीनंतरच दिवस मोठा व रात्र लहान होऊ लागणार आहे.

भोगीच्या तयारीसाठी बाजारामध्ये वाटाणा, हरभरा, गाजर, फ्लॉवर, वांगी, सिमला मिरची घालून तयार करण्यात आलेल्या भाज्यांची रेलचेल आहे. भाज्यांचे दर थोडे वाढलेले असले तरीही या सगळ्या भाज्या एकत्रित करून घेण्याकडे महिलाचा कल आहे. साधारण पंधरा ते वीस रुपये पाव असे या भाज्यांचे दर आहेत.

मकरसंक्रांतीच्या वेळी देण्यात येणारे वाणासाठी खणाचे प्लाऊजपीस, तांब्याचे पाणी पिण्याचे ग्लास, रंगबिरंगी बांगड्यांचे सेट, मोबाल कव्हर, कापडी पिशव्या विक्रीसाठी आल्या आहेत. मकरसंक्रांत तीळ आणि गुळाच्या लाडूशिवाय साजरी होऊ शकत नाही. म्हणूनच घरोघऱी तिळगूळ-पोळी बनवण्याची परंपरा आहे. तीळगुळाच्या सेवनाने थंडीमध्ये शरीराला उब मिळते आणि हे आरोग्यासाठी उत्तम असते.

मकरसंक्रांतीच्या दिवशी गोड पदार्थ देऊन किंवा तीळगुळाचा लाडू देऊन तीळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हटले जाते. ज्या व्यक्तींसोबत कटुता असते ती दूर केली जावी व नवीन सुरुवात या शुभ सणापासून व्हावी, असा सर्वांचा प्रयत्न असतो. एका सकारात्मकतेने आपले नवीन वर्षासाठी सुरुवात या निमित्ताने होते. तीळगुळ व्यतिरिक्त मकरसंक्रातीच्या शुभ दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे.

येवल्यात दरवर्षी पतंगोत्सव साजरा होतो. मात्र पतंग उडवतांना नायलॉन माजा वापरु नये, अन्यथा ऐन सणाच्या दिवशी कारवाईला सामोरे जाण्यााची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. या व्यतिरिक्त संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू साजरे करतात. मैत्रिणींना आणि सुवासिनींना घरी बोलावून हळदी कुंकू लावून त्यांना भेटवस्तू देतात. संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा सात फेबु्रवारीच्या रथ सप्तमीपर्यंत चालणार आहे.

यंदा संक्रांतीचे वाहन सिंह असून उपवाहन घोडा आहे. ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे. नैऋत्य दिशेकडे बघत आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. ती गदाधारी आहे. केशराचा टिळा लावला आहे. सुवासासाठी जाईचे फुल हाती घेतले आहे. ती उभ्या अवस्थेत असून चांदीचे पात्र हाती घेतलेले आहे. तसेच आभूषण म्हणून कंकण धारण केलेले आहे, असे पुरोहीत रमेश जोशी यांनी सांगितले.

मकर संक्रांती पुण्यकाळ - दुपारी 2:43 ते संध्याकाळी 5:45

कालावधी - 3 तास 2 मिनिटे

महापुण्यकाळ - दुपारी 2:43 ते 4:28 पर्यंत

कालावधी - 1 तास 45 मिनिटे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com