निफाड । Niphad (आनंदा जाधव)

गेल्या तीन हंगामापासून बंद असलेला रासाका आता सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निफाडकरांना दिलेला शब्द पाळत रासाकाची निविदा काढत हा कारखाना आमदार दिलीप बनकर यांच्या स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेला 15 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यात आला असून रासाकाच्या माध्यमातून आ. बनकरांची तालुक्यातील सहकारावर मजबूत पकड निर्माण होणार आहे. तसेच रासाकाला देखील पूर्वीचे वैभव प्राप्त होणार असल्याने शेतकरी, सभासद, कामगार व व्यवसायिक यांच्यामध्ये उत्सवाचे वातावरण आहे.

साखर कारखानदारीत एकेकाळी निफाडचे नाव अव्वल होते. मात्र सहकाराचा स्वहाकार झाल्याने आज तीनही साखर कारखाने बंद पडल्याने ऊस उत्पादक शेतकर्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी प्रारंभी निसाका व त्यानंतर रासाकाची निर्मिती केली. तर गेल्या काही वर्षांपूर्वी प्रल्हाद पा. कराड यांनी कादवा-गोदा साखर कारखाना काढला.

मात्र आज हे तीनही साखर कारखाने कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहे. निसाकावर 90 कोटींचे कर्ज झाल्याने अपुरा दुरावा वाढल्याने जिल्हा बँकेने नव्याने कर्ज नाकारल्याने निसाका बंद पडला. त्यानंतर सन 2005 मध्ये रासाकावर देखील 45 कोटींचे कर्ज झाल्याने दि.16.10.2006 रोजी रासाका अवसायानात निघाला. परिणामी दि.30.6.2012 रोजी रासाकाची भाडेपट्टयावर देण्याची निविदा साखर आयुक्त कार्यालयाने प्रसिद्ध केली. परिणामी 1 ऑक्टोंबर 2012 रोजी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने हा कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास घेतला.

त्यांनी 5 वर्ष कारखाना चालविल्यानंतर दि.30.6.2018 रोजी हरिभाऊ बागडे यांचे संभाजी राजे उद्योग समूहाने हा कारखाना चालविण्यास घेतला. त्यांनी या कारखान्याचे तीन गाळप हंगाम केले तर 4 था हंगाम बंद राहिला आणि 5 व्या गाळप हंगामात आरखडे यांनी हा कारखाना चालविला. त्यानंतर 6 वा हंगाम द्वारकाधिश साखर कारखान्याने चालवून अवघे 25 हजार मे. टन ऊसाचे गाळप केले अन् 2018 साली हा कारखाना बंद पडला.

दरम्यान या कालावधीत विनिता, कादवा, कर्हामाई नदीपात्रातून बरेच पाणी वाहून गेले. हरिभाऊ बागडे यांच्या संभाजीराजे उद्योग समूहाने रासाकाचे भाडेपोटी रक्कम थकविली. तसेच कामगारांचे देणे थकल्याने कामगारांनी गाळप केलेल्या हंगामातील साखर विक्रीतून मिळालेल्या रकमेवर न्यायालयात दाद मागितली. परिणामी साखर विक्रीतून मिळवलेले 52 कोटी रु. कोर्टाचे आदेशाने पडून आहेत. आजमितीस रासाकावर 37 कोटी कर्ज असून याव्यतिरिक्त कारखाना भाडे येणे आहे तर हरिभाऊ बागडे यांचेकडून कामगारांचे 17 कोटी तर पंकजा मुंढे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याकडे 1 कोटी 28 लाख रुपये येणे आहेत.

तसेच द्वारकाधिश साखर कारखान्याकडून देखील कामगार, शेतकरी यांचे येणे आहे. रासाकाची ही परिस्थिती असतांना व बाहेरील कारखान्यांवर सभासद व कामगारांचा विश्वास नसल्याने रासाका तालुक्यातीलच सक्षम संस्थेला चालविण्यास द्यावा ही सभासद, शेतकरी व कामगारांची अपेक्षा होती. त्यादृष्टीने शेतकरी व कामगारांनी आवाज उठविला. प्रारंभी निसाका चालू व्हावा यासाठी तालुक्यातील नेत्यांनी प्रयत्न केले.

मात्र जे प्रयत्न केले त्याने निसाका चालू होणे अवघड होते. निसाका बाबत आश्वासनांनाच पाऊस पडला. त्यामुळे निसाका प्रमाणे रासाकाची गत होवू नये यासाठी रासाका बचाव कृति समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना व रासाका कामगार यांनी रासाका चालू व्हावा यासाठी प्रयत्न केले.

यात काळात विधानसभेची निवडणूक लागली अन् अजित पवार यांनी निफाडच्या सभेत दिलीप बनकरांना आमदार करा कारखाना कसा चालू करायचा हे मी बघतो असे आश्वासन मतदारांना दिले. मतदारांनी देखील त्यांचेवर विश्वास ठेवत दिलीप बनकरांना आमदार केले. सहकाराची जाण असलेले आ. दिलीप बनकर प्रथम पासून निसाका भाडेतत्वावर घेण्यास उत्सुक होते.

मात्र आता अजितदादा उपमुख्यमंत्री असल्याने बनकरांना रासाका साठी अडचणी आल्या नाही. आ. बनकर यांनी देखील रासाका सुरू करण्याचे आश्वासन शेतकर्यांना दिले होते. मात्र द्वारकाधिश कारखान्याची निविदा ज्यादा रकमेची निघाल्याने तालुक्यातील शेतकर्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. मात्र अंतिम निर्णय मंत्रीगटाच्या समितीकडे असल्याने व द्वारकाधिश कारखान्याने रासाकाची देणी थकविलेली असल्याने आ. बनकरांच्या स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेच्या निविदेचा मार्ग मोकळा झाला अन् रासाका 15 वर्षांसाठी स्व. अशोकराव बनकर पतंसस्थेला भाडेतत्वावर चालविण्यास मिळाला.

शेतकर्यांना सुगीचे दिवस

साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आल्याने आता पुढील गाळप हंगामात रासाका सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रासाकाच्या रुपाने आ. बनकरांची तालुक्याच्या राजकारणावरील पकड अधिक मजबूत होऊन सहकारात देखील भक्कम पाय रोवले जाणार आहे. आजच्या परिस्थितीत बनकरांच्या ताब्यात असलेल्या सर्वच संस्था या सुस्थितीत व नफ्यात आहेत.

त्यामुळे रासाका बनकरांच्या ताब्यात गेल्याने तो उत्तम प्रकारे चालवला जावू शकतो याची जाण कामगार व ऊस उत्पादक शेतकर्यांना असल्याने रासाका बनकरांना मिळावा यासाठी शेतकरी व कामगारांनी अटोकाट प्रयत्न केले अन् त्यास आता यश देखील आले आहे. साखर कारखानदारीचा अनुभव नसला तरी सहकाराची उत्तम जाण व संघटन कौशल्य, उद्योजक या माध्यमातून तालुक्यात रासाकाला नक्कीच पुर्नवैभव प्राप्त होईल यात शंका नाही.

तसेच रासाकाच्या माध्यमातून तालुक्याचा विकास होण्याबरोबरच ऊस उत्पादक शेतकर्यांना तालुक्यातील हक्काचा कारखाना मिळणार असल्याने शेतकर्यांची होणारी फसवणूक व अडवणूक देखील टळणार असून परिसरात उद्योगधंदे बहरुन एक बंद पडलेली संस्था पुन्हा नव्या जोमाने उभारी घेणार असल्याने आता रासाकाच्या धुराड्याकडे शेतकर्यांच्या नजरा लागून असून बनकरांच्या माध्यमातून रासाका पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल. त्याबरोबरच शेतकरी, कामगार व व्यवसायिकांना देखील सुगीचे दिवस येतील यात शंकाच नाही.