मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या विकासकामांचे लोकार्पण

आढावा बैठक, जिल्हानिर्मितीसह विविध मागण्या मांडणार : आ. दादा भुसे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या विकासकामांचे लोकार्पण

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) 'शासन आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत संपूर्ण राज्यात दौरे करणार असून त्याची सुरुवात शनिवार (दि.30) पासून मालेगाव( Malegaon) येथून होत आहे.

या दौर्‍यात उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा प्रशासकीय आढावा घेण्यासह पोलिस अधिकार्‍यांचे कार्यालय तसेच निवासस्थान इमारतीचे लोकार्पण तसेच बोरी-आंबेदरी व दहिकुटे कालवा, काष्टी येथील कृषि विज्ञान संकुल, रस्ते विकास प्रकल्प व जलजीवन मिशन अंतर्गत दाभाडी 12 गाव, माळमाथा 25 गाव, चंदनपुरी 26 गाव या पाणीपुरवठा योजनांचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार आहे.

यानंतर पोलीस कवायत मैदानावर समस्त मालेगाव तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार केला जाणार असल्याची माहिती माजीमंत्री आ. दादा भुसे ( MLA Dada Bhuse )यांनी येथे बोलतांना दिली.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आ. दादा भुसे, नांदगावचे आ. सुहास कांदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यानिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी बोलतांना आ. भुसे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालेगाव दौर्‍यावर येत असून आज शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास त्यांचे शासकीय विश्रामगृहावर आगमन होवून ते मुक्काम करणार आहेत.

शनिवारी 30 जुलैरोजी सकाळी 10 वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील पाऊस, अतीवृष्टीने झालेल्या पिकांचे नुकसान तसेच विविध विकासकामांचा आढावा प्रशासकीय आढावा बैठकीत घेणार आहेत.

यानंतर कॅम्पातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन व पोलिसांच्या निवासस्थान असलेल्या इमारतींचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार असून यानंतर 25.21 कोटी निधीतून होत असलेल्या बोरी-आंबेदरी व दहिकुटे कालवा, 169.24 कोटी निधीतून काष्टी, ता. मालेगाव येथे साकारली जाणारी कृषि विज्ञान संकुल इमारत, 129.69 निधीव्दारे सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरातील रस्ते विकास प्रकल्प व 104 कोटींच्या निधीतून साकारण्यात येणार्‍या जलजीवन मिशन अंतर्गत दाभाडी 12 गाव, माळमाथा 25 गाव, चंदनपुरी 26 गाव व 32 गावांच्या वैयक्तिक पाणीपुरवठा योजनांचे भूमीपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईनव्दारे केले जाणार असल्याची माहिती आ. भुसे यांनी दिली.

कॉलेज मैदानावर होणार्‍या नागरी सत्कार सोहळ्यात जिल्हानिर्मितीसह पश्चिम वाहिनी नद्या पूर्व वाहिनी करणे, मांजरपाडा प्रकल्प 2, अमृत योजना प्रकल्पास निधी देणे तसेच कांद्याचे दर कमी झाले असल्याने शेतकर्‍यांना दिलासा देणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी जागा व 2 कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा आदी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार असल्याचे आ. भुसे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे अभूतपूर्वस्वागत : आ. कांदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनमाड येथे आपल्या संपर्क कार्यालयात अभूतपूर्व स्वागत केले जाणार असून याठिकाणी 275 कोटींच्या करंजवण योजना तसेच 278 कोटींच्या 56 गाव पाणीपुरवठा योजना व कळवाडी 26 गाव योजनेची टेंडर नोटीस संबंधित ठेकेदारांना दिली जाणार असल्याची माहिती नांदगावचे आ. सुहास कांदे ( MLA Suhas Kande ) यांनी यावेळी बोलतांना दिली. या तिन्ही योजनांमुळे नांदगाव, मनमाडसह मालेगाव तालुक्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे आ. कांदे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस माजी उपमहापौर नीलेश आहेर, सखाराम घोडके, राजेंद्र जाधव, सुनिल देवरे, संजय दुसाने, अजय बच्छाव, डॉ. जतीन कापडणीस, विनोद वाघ, प्रमोद पाटील, भरत देवरे, राजेश गंगावणे, प्रकाश अहिरे, केवळ हिरे, नंदकिशोर मोरे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com