कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे नवआयुक्तांसमोर आव्हान

कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे नवआयुक्तांसमोर आव्हान

नाशिक । निशिकांत पाटील Nashik

नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तपदी अंकुश शिंदे ( Ankush Shinde)यांनी यांनी पदभार स्वीकारला. मात्र नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासह त्यांंच्यापुढे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे आव्हान आहे.

तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी त्यांच्या कार्यकाळात नाशिक शहरासाठी विविध उपक्रम राबविले व बरेच अध्यादेश देखील जारी केले. संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी मोक्का या कायद्याचा वापर करून आनंदवल्ली येथील मंडलिक खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार रिम्मी राजपूत याच्यासह त्याच्या सहकार्‍यांवर कारवाई करत थेट तुरुंगात टाकल्याने शहरात काही अंशी संघटित गुन्हेगारीवर वचक बसला.

त्यानंतर गुन्हेगार सुधार मेळावा घेऊन गुन्हेगारांना सुधरण्याची संधी दिली. त्यानंतर नाशिकचे नाव संपूर्ण भारतात हेल्मेट वापराकरिता मोठे व्हावे, याकरिता हेल्मेटसक्तीची मोहीम राबवली. त्यानंतर मात्र शहरात होणार्‍या सर्वच कार्यक्रमांसाठी मग ते लग्नकार्य का असेना, त्याकरिता पोलीस आयुक्तांची परवानगी अनिवार्य केल्याने नाशिककरांचा त्यांच्याबाबत रोष वाढत गेला. त्यानंतर महसूल अधिकार्‍यांचे दंडाधिकारी पद काढून घेण्याकरिता पोलीस महासंचालकांना लिहिलेले पत्र व त्यानंतर भोंग्यांबाबत परिपत्रक काढले. पांडेय यांनी घेतलेले सर्व निर्णय हेच त्यांच्यानंतर आलेले पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे पुढे कार्यान्वित ठेवले.

नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नक्षल प्रभावित क्षेत्रात देखील आपली कामगिरी चांगल्या प्रकारे निभावली आहे. यासोबतच सोलापूर व पिंपरी- चिंचवड येथे देखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत गुन्हेगारांवर वचक बसविला होता. गेल्या काही महिन्यात शहरात भरदिवसा सोनसाखळी चोरी, दुचाकी, तीनचाकी व चारचाकी चोरी, भुरट्या चोर्‍या, दररोजच विविध गटांमध्ये होणार्‍या हाणामार्‍या यामुळे नाशिक शहराची शांंतता भंग झाली आहे. अल्पवयीन मुलांमध्ये निर्माण होणारी गुंडगिरीची भावना कशी कमी करता येईल, हे फार मोठे आव्हान नवनियुक्त आयुक्त अंकुश शिंदे यांच्या समोर उभे आहे.

आगामी काळात मनपा निवडणुकांचे बिगुल वाजायला सुरुवात होणार आहे. मनपा निवडणुकांमध्ये शांतता कशी ठेवता येईल, त्याकरिता पोलिसांना काय भूमिका घ्यावी लागेल हे देखील महत्वाचे आहे. सर्वसामान्य नाशिककरांना नाशिक शांत हवं आहे. महिलांना व मुलींना घराबाहेर जातांना आपण सुरक्षित आहोत, याची शाश्वती वाटली पाहिजे. वाहनचालकाला आपण गाडी लावत असल्याचे ठिकाण सुरक्षित आहे, असे वाटले पाहिजे. नवनियुक्त पोलीस आयुक्तांसमोर आव्हाने तर खूप आहेत मात्र नाशिककरांचा रोष न पत्करता कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राहील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

गुन्हेगारांच्या मागे पळतांना पोलिसांचे वाहन हे सुस्थितीत असणे गरजेचे आहे. सध्या बर्‍याच पोलीस ठाण्यांतील पोलिसांच्या वाहनांची दुरवस्था झाली असल्याचे वारंवार दिसून आले होते. चारचाकीसह बीटमार्शल चालवत असलेली बरीच दुचाकी वाहनांची देखील दुरवस्था झाल्याचे दिसून येत असल्याने नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी त्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com