सीईटीपी प्रकल्पाला गती मिळणार

सीईटीपी प्रकल्पाला गती मिळणार

सातपूर । प्रतिनिधी

नाशिक औद्योगिक वसाहतीत उभारल्या जाणार्‍या सीईटीपी प्रकल्पाच्या उभारणी कामाला खा. हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नामुळे खर्‍या अर्थाने गती मिळणार आहे .

पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दूरध्वनी करून याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये प्लेटिंग व सरफेस कोटिंग उद्योगांसाठी स्वतंत्र सीईटीपी प्रकल्प उभारण्याचे काम गतिमान करण्यात आले होते. .

यासाठी उद्योग समूहाकडून सहभाग रक्कम जमा करावयाची होती. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसी यांच्या माध्यमातून येणार्‍या निधीबाबत अडचण निर्माण होत होती. परिणामी 31 मार्च रोजी संपलेल्या 50 ते 60 प्लेटिंग उद्योगांच्या परवाने नूतनीकरण करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने नकार दिला. अर्थात पर्यायाने या उद्योगांना क्लोजर नोटीस निघणे क्रमप्राप्त झाले होते.

त्यामुळे प्लेटिंग उद्योजकही त्रस्त झालेले होते. खा.गोडसे यांनी पुढाकार घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिंगारे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनबलगम, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागाचे प्रादेशिक अधिकारी दुर्गुले, एमआयडीसीचे बोरसे तसेच प्लेटिंग उद्योजकांच्या फेडरेशनच्या वतीने विनायक गोखले व व समीर पटवा यांनी चर्चेत प्रमुख्याने पुढाकार घेतला होता.

यावेळी झालेल्या चर्चेत पूर्वीच्या सीईटीपी प्रकल्प मध्ये झिरो लिक्विड डिस्चार्ज (झेडएलडी) हा प्रकल्प उभारण्याचे बंधन केल्याने प्रकल्पाची किंमत वाढून गेली परिणामी एमआयडीसीकडून येणार्‍या योगदानावर त्याचा परिणाम होऊ लागला. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून हा प्रकल्प उभारणीपासून रेंगाळत आहे.

न्यायालयाने सुनावणी दरम्यान हा प्रकल्प उभारणी करणे अन्यथा उद्योग बंद करा असे स्पष्ट संकेत दिले.

मात्र सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून फारशी दाद मिळत नसल्याने अखेर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या प्रश्नावर प्रकाश टाकण्यात आला. खा.गोडसे यांनी सर्व वरिष्ठांची बैठक ऑनलाइन पद्धतीने घेतात येत्या पंधरा दिवसांमध्ये सीईटीपीचा अहवाल तयार करावा, या अहवालामध्ये सीईटीपी प्रकल्पातून निघणारे पाणी हे सांडपाणी गटार योजनेत जोडावे असे ठरविण्यात आले.

या अहवालासाठी एमआयडीसी प्रदूषण नियंत्रण मंडळ मनपा व उद्योजक संयुक्तरीत्या मांडणी करणार आहेत पंधरा दिवसात हा अहवाल सादर करून त्यावर तातडीने निर्णय घेण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव शिंगारे यांनी सांगितले.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व माजी आमदार जयंत जाधव हे मंत्रालयात असल्याने त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिवांशी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे थेट बोलणे करून दिले.

यावेळी पालकमंत्र्यांनी सदर प्रकल्प हा नाशिक औद्योगिक वसाहतीसाठी महत्त्वाचा असून, सर्वांनी सामुदायिक रीतीने तातडीने तोडगा काढावा व प्रकल्प गतीने पूर्ण करावा, अशी सूचना दिली. त्यामुळे आता सीईटीपी प्रकल्प पूर्ण होण्यातील अडथळे दूर होऊन प्रकल्प गतीने पूर्ण होईल अशी आशा प्लेटिंग सरफेस कोटिंग असोसिएशनच्यावतीने व्यक्त केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com