
नाशिक । प्रतिनिधी Nashik
गेल्या सव्वा महिन्यांपासून सुरू असलेल्या कुसमाडी वन बंधार्याचा गाळ काढण्याचा व दुरूस्तीचा या उन्हाळ्यातला टप्पा पूर्ण झाला आहे. वनतळ्याची क्षमता तब्बल 14 कोटी लिटर झाली आहे.त्यामुळे परीसरातील दुष्काळाचे सावट कायमचे दूर होणार आहे.
मोती - गारदा नदी संवर्धन प्रकल्पाच्या वतीने अंकाई किल्ल्यासमोरील सुळेश्वर डोंगरात उगम पावणार्या मोती नदीच्या सपूर्ण पाणलोट विकासाचा संकल्प करण्यात आला. 71 किलोमीटर वाहणारी गोदावरीची ही उपनदी आजवर दुर्लक्षित राहिली होती. येवल्यातला हा सातमाळा डोंगररांगेचा परिसर पूर्वी भरपूर वनराई व दाट झाडीचा प्रदेश म्हणून ओळखला जायचा. कालांतरानंतर तो उजाड झाला आणि त्या सोबतच इथले पर्जन्यमान तथा भूजलपातळीत कमालीची घट झाली. पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले तसे दुसरे पिक दुरापास्त झाले. जनता पाण्यावाचून बेहाल झाली. येथील जीवनमान मंदावले होते.स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य सरकारने महाराष्ट्रातील 75 नद्या अमृतवाहिनी बनविण्यासाठी सुरू केलेल्या 'चला जाणूया नदीला अभियानात' येवला तालुक्यातील मोती नदीचा समावेश केला.
शासनाने नियुक्त केलेले नदी प्रहरी मनोज साठे व प्रशांत परदेशी यांनी पाण्याच्या कामाविषयी तळमळ असलेल्या मित्रपरिवारास गोळा करून संपूर्ण नदीच्या पाणलोटात विकासाची गंगा आणण्याचा संकल्प केला. यासाठी मुंबईच्या मराठमोळं इनोव्हेशन्स संस्थेची मदत घेतली. राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांची सदिच्छादूत म्हणून नेमणूक करण्यात आली. दानशूरांकडून डिझेल, ट्रॅक्टर सेवा, जेसीबी तर बीजेएसकडून पोकलॅन सेवा मिळविली. सव्वा महिना बंधार्यातून गाळ काढण्याचे काम सुरू होते.
1972च्या दुष्काळाच्या वेळी करण्यात आलेली बंधार्याची दगडमातीच्या भिंतीला गळती होत असल्याने पाणी धरत नव्हते. त्या भिंतीच्या दुरूस्तीचे काम घेण्यात आले.
वन्यजीवांस उपयुक्त
या बंधार्याच्या पाण्याचा उपयोग परिसरातील वन्यजीवांस होणार आहे. तसेच गाळ काढल्याने पाण्याचा भूगर्भात भरपूर झिरपा होण्यास मदत होईल व भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. या संपूर्ण कामात सहाय्य करणार्या ग्रामस्थांचा व दानशूर मंडळींचा या स्वप्नपूर्ती सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे. डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्यासह कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांंच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र भूषण चंदाताई तिवाडी यांचे नदीवरचे भारूड या प्रसंगी सादर होणार आहे. पाण्याच्या संवर्धनाचे एकमोठे काम लोक सहभागातून पूर्ण झाल्याने कुसमाडी पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे.