सुकेणेतील बैलगाडा देशात अव्वल

जेसीबीसह मोटारसायकल बक्षिसाचे मानकरी
सुकेणेतील बैलगाडा देशात अव्वल

कसबे सुकेणे। वार्ताहर Kasbe Sukene

मौजे सुकेणे ( Sukene ) येथील रावसाहेब त्र्यंबक मोगल (Raosaheb Trimbak Mughal)यांचा बैलगाडा (Bullock cart) देशात अव्वल ठरला आहे. त्यांच्यासोबत जुगलबंदी साठी पुणे येथून आलेले बाळासाहेब जवळेकर व बंधू यांच्या बैलासह पुण्यामध्ये ( Pune ) 400 फूट अंतर असलेला घाट माथा चढ स्वरुपातील वळण 11.24 सेकंदात पार करत घाटाचा राजा हा किताब मिळवत देशातील सर्वात मोठा बैलगाडा शर्यतीत अंतिम फेरीतील जेसीबी मशीन या बक्षिसासह व मोटारसायकल पटकावली आहे. सुकेणे येथे या बैलगाड्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

पुण्यातील पिंपरी चिंचवड जवळील जाधव वाडी येथे अंतिम शर्यत संपन्न झाली. यामध्ये 11.24 सेकंदात घाटाचा राजा जेसीबी मशीन विजेता हा बहुमान नाशिक जिल्ह्यातील मौजे सुकेणे येथील रावसाहेब त्र्यंबक मोगल यांचा नाशिक जिल्ह्यातील फायनल सम्राट म्हणून प्रसिद्ध असलेला गुरु बैल व बाळासाहेब जवळेकर यांचा हिंदकेसरी सम्राट असलेला मन्या बैल या दोघांच्या बैलगाड्याला मिळाला.

पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांनी या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. संपूर्ण भारतातून नामवंत बैलगाडा या स्पर्धेसाठी पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश आदी राज्यातील बैलगाडा या स्पर्धेत सहभागी झाले होते. मात्र नाशिक जिल्ह्यातील मौजे सुकेणेचे रावसाहेब त्रंबक मोगल यांच्या बैलगाडीने अंतिम फेरी गाठत अंतिम फेरीत पहिल्या पाच मध्ये त्यांचा बैलगाडा अव्वल क्रमांक मारत सामयिक जेसीबी मशीनचे मानकरी ठरत मोटारसायकलचेही बक्षीस पटकावले. ही स्पर्धा 27 ते 30 मे या काळात 1200 बैलजोड्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. अंतिम स्पर्धा 31 मे रोजी संपन्न झाली. यात 70 बैल जोड्या मधून अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली. देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथील रावसाहेब मोगल, पुण्याचे बाळासाहेब जवळेकर व बंधू यांच्या बैलजोडीने जिंकल्याने मौजे सुकेणेसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.

गुरुचे नाव देशभर

करोनाच्या कालावधीत जवळपास दोन वर्षापासून बैलगाडा शर्यत बंद होती. मात्र आता बंदी उठवल्याने या स्पर्धा सुरू झाल्या आहे. स्पर्धेसाठी आमच्या गुरु बैलाची आम्ही दोन महिन्यापासून तयारी सुरू केली होती. अंतिम स्पर्धा जिंकल्याने आम्हाला आमच्या गुरुचा खूप अभिमान आहे. आमच्या गुरूने मौजे सुकेणे गावाचे नाव भारतभर केल्याने आम्हाला त्याचा मोठा अभिमान आहे.

प्रशांत मोगल, शेतकरी पुत्र (मौजे सुकेणे)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com