दोन मोठ्या बाजारपेठांंना जोडणार्‍या पुलाचे काम तीन वर्षापासून बंद

परिसरातील लोकप्रतिनिधींसह अधिकार्‍यांचे कामाकडे दुर्लक्ष
दोन मोठ्या बाजारपेठांंना जोडणार्‍या पुलाचे काम तीन वर्षापासून बंद

सारोळेखुर्द । वार्ताहर Sarolekhurd-Niphad

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) आणि लासलगाव (lasalgaon) या दोन बाजारपेठांंना जवळच्या मार्गाने जोडणार्‍या सारोळेखुर्द येथील विनिता नदीवरील (Vinita river) पुलाचे (Bridge) काम तीन वर्षाचा कालावधी उलटून देखील अद्याप पूर्ण होत नसल्याने परिसरातील शेतकरी (farmers), विद्यार्थी (students), शेतमजूर यांना नानाविध संकटांचा सामना करावा लागत असून पावसाळ्यात तर हा मार्गच अति पाण्यामुळे खंडीत होवून नागरिकांचा निफाडसह (niphad) लासलगावशी संपर्क तुटतो.

आता तर गेल्या काही महिन्यांपासून पुलाचे कामच बंद असून हा पुल पूर्ण कधी होणार असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. पिंपळगाव ते लासलगाव या मार्गावर शेतमालाची मोठी वाहतूक होते. तसेच द्राक्ष हंगामात (Grape season) या परिसरात व्यापार्‍यांचा दिवसरात्र राबता असतो. मागील वर्षापासून खानगाव नजिक येथे भाजीपाला विक्रीचे उपबाजार आवार कार्यान्वित झाल्याने शेतकर्‍यांना जवळची बाजारपेठ झाली असून येथे मिरची, भाजीपाला, बेदाणा मोठ्या प्रमाणात विक्रीला येतो.

तसेच सारोळेखुर्द फाट्यावर वनसगावचे माध्यमिक व महाविद्यालय असून परिसरातून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. तसेच परिसरातील नागरिकांना निफाड व लासलगावला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो. दरवर्षी पावसाळ्यात शेलू व विनिता नदीला मोठ्या प्रमाणात पूर येतो व अशावेळी हा मार्ग खंडीत होतो.

परिणामी परिसरातील नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी पाठपुरावा करुन या दोन्ही नदीवर पुल मंजूर करुन घेतले होते. साहजिकच मागील वर्षी शेलू नदीवरील पुलाचे काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र त्याच काळात मंजूर झालेल्या विनिता नदीवरील पुलाचे काम कासवगतीने सुरू असल्याने व आता काही महिन्यापासून हे काम बंद पडल्याने आता हा पूल पूर्ण होणार तरी कधी असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

पुलाचे कामासाठी संबंधित ठेकेदाराने नदीपात्रात पाईप टाकून तात्पुरता रस्ता केला. मात्र पावसाळ्यात या रस्त्यावरून पाणी वाहून हा मार्ग खंडीत होतो. त्यामुळे विनिता नदीवरील बंद पडलेले पुलाचे काम पुन्हा सुरू करुन ते प्रगतीपथावर पूर्ण करून घ्यावे अशी मागणी होत आहे. तसे पाहता या पुलाचे काम कित्येक महिन्यांपासून बंद असतांनाही संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी गप्प असल्याने त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

पावसाळ्यात तर रानवड (Ranwad), सावरगाव (Savargaon), सारोळेखुर्द परिसरातील नागरिकांना वनसगाव मार्गे सारोळे फाट्यावर येवून लासलगावला ये-जा करावी लागत आहे. शेतमालाची वाहतूक देखील पावसाळ्यात याच मार्गे करावी लागत असल्याने 50 मिटरच्या अंतरासाठी 6 कि.मी. चा हेलपाटा मारावा लागत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी याप्रश्नी लक्ष देवून पुलाचे काम लवकर पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी सारोळेखुर्द परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com