
निफाड। प्रतिनिधी Niphad
पेट्रोल, डिझेल, गॅस ( Petrol, diesel, gas )यांच्या दररोजच्या भाववाढीने ( prices hiked )सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यातून आता सुटका नाही त्यामुळे अनेकांनी आपल्या मुलामुलींचे विवाह सोहळे ( Marriages ) पुढे ढकलली आहेत. मात्र, देवगाव (ता. निफाड) येथील जगदंबा माता मंदिरात संपन्न झालेला विवाह सोहळा सर्वांच्याच स्मरणात राहिल. पेट्रोल, डिझेलपासून सुटका करून घेण्यासाठी वधू-वरासह वर्हाडी मंडळी देखील चक्क बैलगाडीतून विवाह मंडपात आली व साध्या पद्धतीने हा सोहळा झाला. त्यानंतर याच बैलगाडीतून (Bullock cart ) सुनबाईला घरी नेण्यात आले.
नांदूर (नाशिक) येथील राजेंद्र शिंगवे यांची कन्या कोमल व देवगाव (ता. निफाड) येथील सोमनाथ सूर्यभान निकम यांचा मुलगा सचिन यांचा विवाह देवगाव येथे साध्या पद्धतीने झाला. मात्र या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली. अलिकडच्या काळात लग्न सोहळा म्हटलं की, चकाचक गाड्या, वधू-वरांसाठी भरपूर फुलांनी सजविलेली चारचाकी गाडी, डी.जे. च्या तालावर थिरकणारी तरूणाई व मिरवणुकीप्रसंगी पाहुणे मंडळींचा भन्नाट डान्स, त्यानंतर वरातीचा अवाढव्य खर्च यामुळे विवाह सोहळे अधिक खर्चिक होत आहे.
त्यातच महागाई वाढल्याने अनेक सुज्ञ नागरिक साध्या विवाह सोहळ्यांना पसंती देवू लागले आहेत. मात्र, देवगावचा विवाह सोहळा हा अनेकांच्या स्मरणात राहिल असा झाला आहे. पेट्रोल, डिझेल महागल्याने वधू-वर चक्क बैलगाडीतून लग्न मंडपात आले. तसेच लग्नाला आलेले सर्व वर्हाडी देखील सजविलेल्या बैलगाडीतून आली. त्यानंतर पारंपारिक पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला. लग्न मंडपात येतांना नवरी सजविलेल्या गाडीतून न येता पानाफुलांनी सजविलेल्या बैलगाडीतून आली अन् याच बैलगाडीतून सूनबाईला घरी नेण्यात आले.
यावेळी वर पिता सोमनाथ निकम म्हणाले की, सध्या दररोजच पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढत आहेत. या दरवाढीचा फटका शेती व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसला असून प्रवासी भाडे देखील महागले आहेत. त्यामुळे आम्ही रूढी, परंपरा यांना फाटा देत व डामडौल बाजूला सारत साध्या पद्धतीने मुलाचा विवाह करण्याचा निश्चय केला. मुलीकडच्यांनी त्यास होकार दिला अन् हा सोहळा कमी नागरिकांच्या उपस्थितीत देवगावच्या जगदंबा माता मंदिरात साध्या पद्धतीने संपन्न झाला. मात्र या सोहळ्यापेक्षाही वधू-वरासह वर्हाडी मंडळीचा बैलगाडीने विवाहस्थळी झालेला प्रवेश सर्वाधिक चर्चेत राहिला. पेट्रोल अन् डिझेल दरवाढीमुळे वधू-वराकडील मंडळीने पुन्हा पारंपारिक साधन असलेल्या बैलगाडीला पसंती दिल्याचे दिसून आले.
शासनाने वाढविलेले पेट्रोल व डिझेलचे भाव याचा यावेळी निषेध करण्यात आला. या दरवाढीने सामान्यांचा प्रवास देखील महागल्याने ‘बरी आपली बैलगाडी अन् गॅस ऐवजी चूल’ असे म्हणत ग्रामिण भागात आता पुन्हा चुली पेटविल्या जावू लागल्या आहेत. त्यामुळे शासनाने पेट्रोल, गॅस, डिझेलचे भाव कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी दिली आहे.