दोन दिवस उलटूनही मृतदेह रुग्णालयातच
USER

दोन दिवस उलटूनही मृतदेह रुग्णालयातच

पोलिसांच्या मदतीने नातेवाईकांना बोलावून केला अंत्यसंस्कार

नवीन नाशिक । प्रतिनिधी

करोनामुळे जवळची माणसे कशी दुरावतात ही घटना प्रत्यक्षात दिसून आली. नवीन नाशकतील एका खासगी रुग्णालयात सिन्नर येथील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाच्या नातेवाईकांना कळवले. मात्र दोन दिवस उलटूनही नातेवाईक मृतदेह घेण्यास येत नसल्याने अखेर पोलिसांच्या मदतीने नातेवाइकांना बोलावून रुग्णाचा अंत्यविधी केल्याची घटना समोर आली.

गुळवंच, तालुका सिन्नर येथील छबू कांगणे (38) या करोनाबाधित रुग्णाची तब्येत चिंताजनक असल्याने बेड उपलब्ध व्हावा यासाठी अनेक नातेवाईक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे त्रिमूर्ती चौकातील एका रुग्णालयात फोन सुरू होते. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बेड उपलब्ध झाल्याने कांगणे यांना उपचारासाठी दाखल केले. यावेळी कांगणे यांची ऑक्सिजन लेव्हल 37 इतकी असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

त्यानंतर उपचार सुरू असताना रविवारी कांगणे यांची ऑक्सिजन लेव्हल खालावल्याने हॉस्पिटलमधून या रुग्णाच्या नातेवाईकास तुमचे पेशंट खूपच सीरियस असल्याबाबतचा फोन करण्यात आल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. यानंतर रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर मीटरमधून रुग्णाच्या नातेवाईकास फोन करून तुमच्या रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.

दोन दिवस उलटले तरीही रुग्णाचे नातेवाईक मृतदेह घेण्यास आले नाही. अखेर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांच्या मदतीने रुग्णांच्या नातेवाईकांना बोलावून रुग्णाचा मृतदेह अखेर हॉस्पिटलमधून काढून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com