औरंगपूर उपबाजारामुळे मालवाहतूक खर्च घटणार

पिंपळगाव बाजार समितीच्या नव्या यार्डामुळे शेतकर्‍यांना सुविधा
औरंगपूर उपबाजारामुळे मालवाहतूक खर्च घटणार

नाशिक । सोमनाथ ताकवाले

पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने ( Pimpalgaon Agricultural Produce Market Committee ) निफाड आणि सिन्नर तालुक्यातील गोदाकाठ परिसरात असलेल्या शेतकर्‍यांना सोईस्कर ठरेल, असे नवीन उपबाजार आवार औरंगपूर ( Aurangpur ) येथे सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण आहे. या उपबाजार आवारामुळे कांंदा उत्पादक, भुसारमाल आणि भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना दूरवर असलेल्या यार्डात जाण्यासाठी करावा लागणारा अधिक इंधन खर्च आणि वाहन खर्च कमी होणार आहे.

पिंपळगाव बाजार समितीत केलेल्या मालाच्या व्यवहाराचे रोख हिशेब आणि चोख, पारदर्शी व्यवहारामुळे या समितीच्या मुख्य आवारांसह उपबाजारांमध्ये निफाडसह इतर तालुक्यातील शेतकर्‍यांची माल विक्रीसाठी आणण्यास पसंती असते. पण, अनेक उपआवारातील अंतर कमी-अधिक असल्याने शेतकर्‍यांना वाहतूक खर्च, वेळेचा विलंब आणि त्यामुळे मालाची होणारी नासाडी त्रासदायक ठरते.

सध्या तर पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि सीएनजी, या वाहतूक वाहनांच्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतमालाची वाहतूक करताना होणारा खर्च शेतकर्‍यांच्या हातात पडणार्‍या पैशांमधून अधिक होतो. त्यामुळे जे आवार जवळ असेल आणि तेथील व्यवहार चोख असतील, अशा बाजार समितीच्या मुख्य आणि उपआवारात शेतमाल लिलावाला नेण्यास शेतकर्‍यांकडून प्राधान्य असते. पिंपळगाव बाजार समितीच्या चोख व्यवहाराची ख्याती शेतकर्‍यांमध्ये असल्याचे हेरून या बाजार समितीने विद्यमान उपआवाराच्या व्यतिरिक्त नव्याने होऊ शकणार्‍या उपआवाराची चाचपणी केली होती. त्यात औरंगपूर हा उपआवार होऊ शकतो, हे लक्षात घेतले होते.

औरंगपूर येथे होणार्‍या उपबाजार आवारामुळे निफाड तालुक्यातील निपानी पिंपळगाव, तळवाडे, औरंगपूर, भेंडाळी, महाजनपूर, तळवाडे, म्हाळसाकोरे, करंजगाव, भेंडाळी, चित्तेगाव, तारुखेडले, तामसवाडी, करंजगाव, ब्राह्मणवाडे, मांजरगाव आदी गावातील शेतकर्‍यांना तर सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंंप्री, निमगाव, हिवरगाव, केपानगर, कोमलवाडी, सुळेवाडी आदी गावांतील शेतकर्‍यांना मालविक्रीस कमी अंतर होणार आहे.

यामुळे शेतकर्‍यावरचा वाहतूक खर्चाचा भार कमी होऊन वेळेचा अपव्ययही टळणार आहे. बाजाराच्या उपआवारासाठी औरंगपूर ग्रामपंचायतीने सुमारे 12.5 एकर जागेचा ठराव करून दिलेला आहे. पण बाजार समितीसाठी आवश्यक असलेल्या जागेचे सोपस्कर आणि खरेदीचे व्यवहारात जिल्हधिकार्‍यांच्या संमतीने व्हावे लागत असल्याने पिंपळगाव बाजार समितीने प्रक्रियाही पूर्ण करून जागेची रकम अदा केल्याचे आ.दिलीप बनकर यांनी सांगितले.

औरंगपूर उपबाजार आवारात दर गुरूवार आणि रविवार कांद्याचे लिलाव होणार आहेत. तर दररोज भुसारमाल, धान्य आणि भाजीपाल्याचे व्यवहार होणार आहेत. पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या मुख्य आवार असलेल्या शरदचंद्र पवार मार्केट यार्डात सध्या कांद्यासह टोमॅटोचा लिलाव होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर असलेल्या दुसर्‍या आवारात डाळींबाचे लिलाव होतात. तर पिंपळगाव बसवत गावठाणात असलेल्या जुन्या आवारात भाजीपाल्याचे लिलाव होतात.पालखेड येथे मका, सोयाबीन, द्राक्ष हंगामात बेदाणा, द्राक्षांचे लिलाव होता. ओझर उपबाजार आवारात धान्य आणि टोमॅटोचे लिलाव होता. सायखेडा आवारात कांदा, धान्य लिलाव होत असतात.

निफाड आणि सिन्नर तालुक्यातील शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीसाठी दूर जावे लागत होते. ही अडचण ओळखून सुरूवातीला चित्तेगाव फाटा येथेच उपबाजार सुरू करण्याचे नियोजन होते. पण, औरंगपूर येथे मोठी जागा उपलब्ध झाल्याने येथे उपआवार सुरू करण्याचा निर्णय घेतला. कांद्यासह धान्य, भुसारमालाचे लिलाव येथे होणार आहेत. या बाजारामुळे निफाडसह सिन्नरच्या शेतकर्‍यांना माल लिलावाला आणणे सोपे होणार आहे. उपआवारात मूलभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. 15 ऑगस्टपर्यंत उपबाजार शेतकर्‍यांच्या सेवेत असेल.

आ. दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती ( MLA. Dilip Bankar, Chairman, Pimpalgaon Baswant APMC )

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com