नाशिककरांना थंडीची चाहूल

आठवडाभरात पार्‍यात 5 अंशांची घसरण
नाशिककरांना थंडीची चाहूल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गेल्या पंधरवड्यापर्यंत शहरासह जिल्ह्यात पाऊस रेंगाळत होता. त्यानंतर उन्हाचा कडाका वाढला. आता ‘ऑक्टोबर हिट’सोबत नाशिककरांना थंडीचीही चाहूल लागली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानाचा पारा घसरू लागला आहे.

आठवडाभरात पारा 5 अंशांनी घसरला आहे. 18 ऑक्टोबरला किमान तापमान 20.6 अंश होते. आज ते घसरून 15.6 नोंदवले गेले. शहरात किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असून शनिवारी (दि.23) या मोसमातील नीचांकी 14.6 अंश सेल्सिअस तापमान नाशकात नोंदवले गेले.

शहरात थंडीचा कडाका जाणवू लागला असून, नाशिककरांना थंडी अनुभवयास येत आहे. त्यामुळे शहरातील जॉगिंग ट्रॅक असो किंवा गोल्फ क्लबसारखी मैदाने असो; नागरिकांची पावले तिकडे वाळू लागली आहेत. शहरातील वातावरणात दिवसभर सातत्याने बदल अनुभवायला येत आहे. पहाटेपासून सकाळी 9 वाजेपर्यंत थंड वातावरण तर त्यानंतर उन्हाचा कडाका अनुभवायास मिळतो. त्यानंतर सायंकाळी 7 नंतर पुन्हा थंड वारे वाहू लागल्याने हवेत गारवा निर्माण होत आहे.

शहरातील गोदाकाठी शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. गोदाकाठची गावेदेखील थंडीने कुडकुडण्यास सुरुवात झाली आहे. निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा, चापडगाव, नांदूरमध्यमेश्वर आदी ठिकाणी गेल्या वर्षीच्या जानेवारीत सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. यावर्षी हेच तापमान किती खाली जाते, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com