कांद्याची थकित रक्कम संचालक मंडळातर्फे अदा

282 शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा
कांद्याची थकित रक्कम संचालक मंडळातर्फे अदा

मनमाड । प्रतिनिधी

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत चार कांदा व्यापार्‍यांकडून फसवणूक झालेल्या 282 कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे 32 लाख 43 हजार 197 रुपये संचालक मंडळाने त्यांच्या खिशातून अदा केले.

आ. सुहास कांदे यांच्या प्रयत्नामुळे तब्बल चार वर्षांनंतर कष्टाचे पैसे मिळाले आहेत. बी-बियाणे घेण्यासाठीदेखील पैसे नव्हते. त्यामुळे ऐन पेरणीच्या काळात पैसे मिळाल्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.

मनमाड कृषी बाजार समितीतील अंबादास रामदास लष्करे, मोहन चौधरी, मनोहर गोसावी, सागर गुंजाळ, संतोषकुमार संकलेचा या पाच कांदा व्यापार्‍यांनी 2017 मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यात 282 शेतकर्‍यांकडून कांदा खरेदी केल्यानंतर त्यांना चेक दिले होते.

शेतकर्‍यांनी त्यांना मिळालेले चेक बँकेत जमा केले मात्र व्यापार्‍यांच्या खात्यावर पैसे शिल्लक नसल्यामुळे चेक बाऊन्स झाले होते. शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांकडे धाव घेऊन चेक बाऊन्स होत असल्याबाबत विचारणा केली असता लवकरच तुमचे पैसे अदा करू, असे आश्वासन व्यापार्‍यांनी दिले होते. मात्र वारंवार चकरा मारूनदेखील पैसे मिळत नसल्याचे पाहून शेतकर्‍यांनी बाजार समिती प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.

या तक्रारींची दखल घेत बाजार समिती प्रशासन व संचालक मंडळाने व्यापार्‍यांना शेतकर्‍यांचे पैसे अदा करण्यास सांगितले होते. त्यावेळी व्यापार्‍यांनी काही मुदत मागितली होती. मात्र मुदत संपल्यानंतरदेखील व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांचे पैसे दिले नाही.

त्यामुळे अखेर या व्यापार्‍यांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. व्यापार्‍यांनी तब्बल 32 लाख 43 हजार 197 रुपयांची फसवणूक केली होती. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले होते. पैसे मिळणार की नाही असा प्रश्न त्यांना पडला होता.

प्रकरण जिल्हाधिकार्‍यांपर्यंत गेल्यावर त्यांनी व्यापार्‍यांची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव करून शेतकर्‍यांचे पैसे देण्याचा निर्णय दिला होता. मात्र प्रकरण कोर्टातदेखील असल्यामुळे मालमत्ता लिलाव करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे पाहून अखेर आ. सुहास कांदे यांनी सर्व संचालकांनी आपापसात पैसे गोळा करून ते शेतकर्‍यांना देण्याचा प्रस्ताव संचालकांसमोर ठेवला. तो प्रस्ताव सर्व संचालकांनी मान्य केला आणि अखेर शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शेतकर्‍यांना त्यांचे पैसे देण्यात आले.

यावेळी सभापती डॉ.मच्छिंद्र हाके, उपसभापती राजू सांगळे, माजी सभापती अंकुश कातकडे, किशोर लहाने, अशोक पवार, शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे यांच्यासह इतर संचालक उपस्थित होत. संयोजन सचिव रमेश कराड यांनी केले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com