जनावरांना लम्पी आजाराची लागण?

जनावरांना लम्पी आजाराची लागण?
देशदूत न्यूज अपडेट

जानोरी | वार्ताहर | Janori

अज्ञात रोगाने (Disease) जनावरांना (Animals) ग्रासले असून शेतकर्‍यांमध्ये (Farmers) भीतीचे वातावरण पसरले आहे. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना (Veterinary Officer) माहिती देऊनही पाहिजे तसे सहकार्य न केल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे....

मडकीजांब (ता. दिंडोरी) येथील शेतकर्‍यांच्या 70 ते 80 जनावरांना अज्ञात रोगाने ग्रासले असून जनावरांच्या शरीरावर गाठी येतात व त्या गाठी फुटून त्याची जखम तयार होते. यात ताप येणे, पाय सुजणे तसेच मानेला गाठ आल्याने चारा न खाणे असे प्रकार घडत असून यातून जनावरे दगावणार नाही ना? या भीतीने शेतकरी भयभीत झाले आहेत.

पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी यावर आवश्यक उपाययोजना म्हणून काही लस उपलब्ध होत असेल तर ती लवकरात लवकर शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. आधीच करोनाने सर्वत्र थैमान घातले आहे.

त्याच्या भीतीच्या सावटातून बाहेर निघाले असताना या अज्ञात रोगामुळे शेतकर्‍यांमध्ये आणखीनच भीतीचे वातावरण पसरले आहे. जनावरांच्या सहवासातून तो रोग माणसांना होणार नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे त्यावर लवकरात लवकर उपाययोजना होणे आवश्यक आहे. संबंधित पशुवैद्यकीय अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता आठ-दहा दिवसांत जनावरे बरे होतील, असे सांगितले जाते.

परंतु कोणत्याही औषधविना जनावरांचे होणारे हाल बघता शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष देऊन जनावरांसाठी लस किंवा औषध उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ज्ञानेश्वर वडजे (Dnyaneshwar Wadje), बाळासाहेब वडजे (Balasaheb Wadje), विलास वडजे (Vilas Wadje), शरद वडजे (Sharad Wadje), विजय वडजे (Vijay Wadje), शरद बोराडे (Sharad Borade), दत्तू बोराडे (Dattu Borade), प्रकाश वडजे (Prakash Wadje) आदींनी केली आहे.

हा लम्पी त्वचा रोगाचा प्रकार असून 4 ते 14 दिवसांपर्यंत या रोगाचा कालावधी असतो. लक्षणे आढळल्यास इतर जनावरांपासून त्याला वेगळे ठेवणे, गोठ्यातील किटकांचा बंदोबस्त करणे, जनावरांचा गोठा कोरडा, स्वच्छ आणि निर्जंतूक ठेवणे, डॉक्टरांशी संपर्क साधून औषधोपचार करून घेणे हे पर्याय शेतकर्‍यांनी अवलंबवावे.

- डॉ. दयानंद हयातनगरकर, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी.

सध्या मडकीजांब येथील 70 ते 80 गायींना अज्ञात रोगाने ग्रासले असून संबंधित पशुवैद्यकीय अधिकार्‍यांशी संपर्क साधूनही कोणतेही अधिकारी आमच्याकडे फिरकले नाही. खासगी डॉक्टरांचा खर्च न परवडणारा आहे. तरी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी औषधोपचार व मार्गदर्शन शेतकर्‍यांना द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांच्या वतीने करतो.

- ज्ञानेश्वर वडजे, शेतकरी, मडकीजांब.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com