आडत्याने थकवलेली रक्कम शेतकर्‍यांना मिळणार

बाजार समिती करणार गाळा लिलाव; बँक गॅरंटीही मोडणार
आडत्याने थकवलेली रक्कम शेतकर्‍यांना मिळणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (Nashik APMC ) एका आडतदाराने टोमॅटोच्या मालापोटी अनेक शेतकर्‍यांच्या रकमा थकविल्या होत्या. शेतकर्‍यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवरून बाजार समिती प्रशासनाने संबंधित आडत्याच्या ( Broker) गाळ्याचा लिलाव (Shop Auction )व बँक गॅरंटी मोडून शेतकर्‍यांचे जवळपास 25 लाख रुपये तीन दिवसांत परत देणार आहे.यापैकी काही शेतकर्‍यांचे कष्टाचे पैसे मिळाल्याने शेतकर्‍यांनी सभापती देविदास पिंगळे व संचालक मंडळासह सचिव व बाजार समिती प्रशासनाचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी सभापती देविदास पिंगळे, संचालक दिलीप थेटे व सचिव अरुण काळे उपस्थित होते.

पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड येथे टोमॅटो व्यापार करणारे जलाराम ट्रेडिंग कंपनी प्रोप्रायटर ठक्कर याला दिंडोरी रोडवरील मुख्य मार्केट यार्ड गाळा क्र. 12 हा 99 वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आलेला होता.मध्यंतरीच्या काळात आडत्याने बाजार समितीचे लायसन्स घेऊन टोमॅटो या शेतमालाचा खरेदी विक्रीचा व्यवसाय केला.या आडत्याने जिल्हाभरातील अनेक शेतकर्‍यांकडून टोमॅटो घेतला आणि त्यांची शेतीमाल विक्रीची रक्कम थकवली.

याबाबत अनेकदा मागणी करूनही शेतकर्‍यांना थकीत रक्कम मिळत नव्हती. त्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांनी बाजार समितीकडे यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या.ऐन करोनाकाळात शेतकर्‍यांना कष्टाचे पैसे मिळत नसल्याचे पाहून सभापती देवीदास पिंगळे यांनी शेतकर्‍यांच्या शेतीमाल विक्रीची रक्कम परत करण्यासाठी पुढाकार घेतला. संबंधित गाळ्याचा 24 जानेवारी रोजी जाहीर लिलाव ठेवण्यात आला होता. संबंधित शेतकर्‍यांना तसे आवाहनही करण्यात आले होते.त्यानुसार ज्या ज्या शेतकरी बांधवांचे फक्त नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्री केल्यानंतर सदर आडत्याने पैसे थकवले होते,

अशा शेतकर्‍यांनी आवश्यक दस्तऐवजांसह सोमवारी सकाळी 11 पर्यंत बाजार नियमन विभागात तक्रारी केल्या. त्या तक्रारींची शहानिशा करून बाजार समितीने गाळ्याचा लिलावापोटी व बँक गॅरंटी मोडून जमा झालेली जवळपास 25 लाख रुपयांची रकम शेतकर्‍यांना धनादेशाद्वारे देण्यात येणार आहे. कष्टाने पिकविलेल्या शेतमालाची आडत्याने थकविलेली रकम परत मिळेल, अशी अपेक्षा नसताना बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांच्या पुढाकाराने सदर रकम परत मिळाल्याने संबंधित शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त करीत सभापती देवीदास पिंगळे, संचालक मंडळ, सचिव आणि बाजार समिती प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकर्‍यांची असून, शेतकरी आणि आडते यांच्यातील दुवा म्हणून समिती काम करते. त्यामुळे शेतकरी हा बाजार समितीचा मुख्य घटक आहे. यापुढे आडत्याने शेतकर्‍यांचे पैसे थकविल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या तर सदर आडत्याचा गाळा सील करून त्याचा लिलाव केला जाईल.बाजार समितीचे आडत्यांवर नियंत्रण असते,त्यामुळे शेतकर्‍यांनी न डगमगता निःसंकोचपणे आपला शेतमाल हा बाजार समितीतच आणावा.

देवीदास पिंगळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक.

Devidas Pingale, Chairman, Agricultural Produce Market Committee, Nashik.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com