नाशिक । रवींद्र केडिया Nashik

नाशिकच्या विमानसेवेला करोना महामारीच्या काळात गती मिळाली आहे

एकट्या ऑगस्ट महिन्यात पाच हजार नागरिकांनी विमान सेवेचा लाभ घेत शहरात दाखल झाले तर सहा हजार प्रवाशांनी नाशिकहून विविध शहरांमध्ये प्रवास केला आहे.

देशांतर्गत वाहतुकीच्या व्यवस्था ठप्प असल्याने दळणवळणासाठी नागरिकांना विमानसेवा उपयुक्त ठरली आहे.

एक जून ते दहा जुलै दरम्यान जेटचे विमान अहमदाबादसाठी सेवा देत होते. या कालावधीत 635 प्रवासी अहमदाबादहून नाशिकला आले. तर 563 प्रवासी अहमदाबादकडे गेल्याचे दिसून आले.

या पाठोपाठ अलायन्स एअरलाइनची सेवा 12 जूनपासून हैदराबाद- नाशिक- अहमदाबाद - पुणे - हैदराबाद अशी सुविधा निर्माण केली होती.

यात हैदराबादहून नाशिकसाठी 12 जून ते 31 ऑगस्ट दरम्यान 1842 प्रवाशांनी लाभ घेतला. तर नाशिकहून हैदराबादसाठी 2447 प्रवाशांनी लाभ घेतला.

नाशिकहून अहमदाबादसाठी 1963 तर अहमदाबादहून नाशिकसाठी 1732 प्रवाशांनी विमानातून प्रवास केला. नाशिकहून पुण्याला 1061 प्रवासी तर पुण्याहून नाशिकला 814 प्रवाशांनी लाभ घेतला.

विमानतळ असलेल्या छोट्या शहराला भारतातील मुख्य शहरांची जोडण्याच्या दृष्टीने उडान या सुविधेचा माध्यमातून विविध विमान कंपन्यांना विमान सेवा सुरू करणे बंधनकारक करण्यात आले होते.

या उपक्रमाअंतर्गत जेट विमानसेवा व अलायन्स एअरलाईन्सने विमानसेवा सुरू केली. मात्र अजूनही बर्याच शहरांना जोडला जाणे प्रलंबित आहेत.

शासनस्तरावरून दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असली तरी सुरु केल्या जाणार्या सुविधा अत्यल्प आहेत.

आज नाशिक शहरातून अहमदाबाद, हैदराबाद, पुणे या शहरांमध्ये जाता येणे सोपे आहे. अनेक प्रवासी या शहरांच्या माध्यमातून पुढील शहरांसाठी प्रवासाची जोडणी करीत आहेत.

5 शहरांची विमानसेवा जोडणी प्रलंबित

खा. गोडसेच्या पाठपुराव्यामुळे नाशिकहून दिल्लीची विमानसेवा सुरु झाली होती. कालांतराने विमान कंपनीच्या अडचणींमुळे ती बंद पडली आहे. ती गतिमान करणे गरजेचे आहे. यासोबतच बंगळुरू, इंदोर, हिंदण,गोवा या शहरांसाठी उड्डाण योजनेअंतर्गत विमान कंपन्यांना मंजूर करण्यात आलेल्या सेवा तातडीने सुरू करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावरून प्रयत्न होण्याची गरज आहे. या शहरांसाठी देखिल प्रवाशांची संख्याही मोठी राहणार आहे.

मनीष रावल, निमा प्रतिनिधी