जलशुध्दीकरण केंद्र दुरुस्तीची निविदा लवकरच
नाशिक

जलशुध्दीकरण केंद्र दुरुस्तीची निविदा लवकरच

अधिकारी - स्थानिक नगरसेवक यांच्या बैठकीत महापौरांची माहीती

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकरोड येथील जलशुद्धीकरण केंद्राची दुरूस्तीची निविदा आठ दिवसात काढून लवकरात लवकर त्याबाबतचे काम हाती घेण्यात यावेत आणि गांधीनगर येथून कायम स्वरूपी स्वतंत्र टँकर सुरू करण्यात यावे यासंदर्भात तातडीने नियोजन करावेत असे निर्देश महापौर सतिश कुलकर्णी यांनी दिले.

नाशिकरोडचा पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या दृष्टीने उपायोजना करून नियोजन करण्यासाठी महापौर निवासस्थान रामायण याठिकाणी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व अधिकारी - स्थानिक नगरसेवक यांच्या उपस्थित बैठक झाली. नाशिकरोड मध्ये सातत्याने उद्भवणारा पाणीप्रश्न त्वरित सोडवण्याच्या दृष्टीने गेल्या 14 ऑगस्टच्या महासभेत जाहीर केल्याप्रमाणे ही बैठक झाली.

या बैठकीत नगरसेवक संभाजी मोरुस्कर, अंबादास पगारे, प्रा. शरद मोरे, पंडित आवारे यांनी विविध सूचना मांडल्या. यात महापौरांनी नाशिकरोड वासियांचा पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. नाशिकरोडचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने योग्य पद्धतीने नियोजन करावे.

तसेच 225 कोटीचा अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा विभागाच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिल्यानंतर शहरातील पाणीपुरवठाची कामे करताना नाशिकरोड मधील कामांना प्रथम प्राधान्य देऊन पाणीपुरवठा कामात गती देण्यात यावी. नाशिकरोड मधील पाणी प्रश्नाबाबत नगरसेवकांशी संपर्कात राहून त्यांचे प्रश्न सोडवावेत, असे निर्देश महापौरांनी दिले.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे, अधीक्षक अभियंता एस. एम. चव्हाणके, कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत, उपभियंता अनिल दप्तरे, शैलेश जाधव, जेऊघाले उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com