राज्यात १०० विद्युत बस हाेणार दाखल; नाशिकसह १० स्थानकात 'चार्जिंग स्टेशन'

राज्यात १०० विद्युत बस हाेणार दाखल; नाशिकसह १० स्थानकात 'चार्जिंग स्टेशन'
E-Shivaiआगार एकमध्ये ‘ई-शिवाई’चे चार्जिंग स्टेशन

नाशिक | प्रतिनिधी

कराेनाच्या गंभीर संकटातही आणि आर्थिक स्थिती खालावलेली असताना राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाने कात टाकण्यास सुरुवात केली आहे...

राज्यातील १० एसटी स्थानकांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून, या अंतर्गत नाशिक, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, कोल्हापूर याठिकाणी एकूण ५० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

दरम्यान, निविदा उघडून दोन आठवड्यानंतरही नेमक्या किती कंपन्यांनी विद्युत बसला प्रतिसाद दिला, हे स्पष्ट झालेले नाही. विद्युत वाहनांच्या जास्तीत जास्त वापरावर भर देण्याचे धोरण केंद्र सरकारचे आहे.

अशा बससाठी केंद्राकडून अनुदान मिळत असल्याने सर्वच राज्य परिवहन महामंडळानी विद्युत बसचा समावेश करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात १०० विद्युत एसटी दाखल होणार आहेत.

त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. बस पुरवणाऱ्या कंत्राटदारांनाच विद्युत चार्जिंग स्टेशन उभारणे बंधनकारक आहे, अशा निविदेच्या अटी आहेत.

विद्युत बससाठी मागवण्यात आलेल्या निविदेला कंपन्याच्या प्रतिसादाबाबत माहिती मिळाली नसून लॉकडाउन काळातील १५ टक्के मनुष्यबळ निर्बंधामुळे अडचण जाणवत आहे. ८ मे रोजी निविदा उघडण्यात आल्या आहेत. किती कंपन्यांनी प्रतिसाद दिला, याची माहिती मनुष्यबळ उपलब्ध झाल्यावर मिळेल, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

'शिवाई' आली का ?

सप्टेंबर २०१९ मध्ये मुंबई सेंट्रल येथे एसटीच्या शिवाई या विद्युत बसचे लोकार्पण करण्यात आले होते. यावेळी एकूण १५० बस ताफ्यात दाखल होणार असून पहिल्या टप्प्यात ५० बस येतील, अशी घोषणा एसटी महामंडळातर्फे करण्यात आली होती. आतापर्यंत ही शिवाई प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होऊ शकलेली नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com