सातपूर । प्रतिनिधी Satpur

मुख्य बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी मंडई परिसरात मोठ्या प्रमाणात भाजी व्यावसायिकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता. त्यामुळे ऐन दिवाळीत व्यावसायिकांना व्यवसाय करणे कठीण झाले होते.

सातपूर परिसरातील शेतकरी बांधव व व्यापारी वर्ग यांनी एकत्रितपणे यातील कामाला विरोध केला होता. मनपा प्रशासनाने या व्यवसायिकांना क्लब हाऊस परिसरातील रस्त्यालगत जागा उपलब्ध करून दिली आहे. रस्त्यावरील हे अतिक्रमण हटलेले आहे. सातपूर गावातील रस्ते मोकळे झाले. मात्र औद्योगिक परिसरातील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी दिसू लागली आहे.

अशोक नगर व श्रमिक नगर परिसरातही थोड्याबहुत फरकाने हाच गोंधळ दिसून येतो. अशोक नगर येथील भाजी मार्केट बंद केले होते. परिणामी भाजी व्यावसायिक रस्त्याच्याकडेला बसू लागले होते. रस्त्याच्या कडेला वाहतुकीची गर्दी आणि वाहनांची कोंडी होऊ लागल्याने या व्यावसायिकांना रस्त्यावर बसल्यास मज्जाव केला. यात भाजी व्यावसायिक व मनपा सेवकांंमध्ये वादाचे प्रसंग निर्माण झाले होते.

अनेक वेळा तो वाद पोलीस स्टेशनपर्यंत गेला होता. अखेर प्रशासनाने त्यांना मागे सरकून बसायाला जागा उपलब्ध करून दिल्याने काही अंशाने वाद निवळला असला तरी भाजीबाजारात गोंधळ कायमच आहे.

शिवाजीनगर कार्बन नाका येथे रस्त्याच्या कडेला भाजी बाजाराची मोठी गर्दी असते. या व्यावसायिकांना शिवाजीनगर येथील मार्केट परिसरात जागा दिली असतानाही व्यावसायिक रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करीत असल्याने औद्योगिक क्षेत्रात जाणार्या वाहनांची गर्दी कामावरून घरी परतणार्या कामगारांच्या दुचाकींची गर्दी आणि भाजी खरेदी करणार्यांची गर्दी यामुळे परिसर धोकादायक बनले आहे.

या परिसरातून वाटे काढणे वाहनचालकांना अतिशय कसरतीचे झाले आहे. सातत्याने कारवाई करूनही व्यावसायिक प्रशासनाला दाद देत नसल्याने बाजाराचा प्रश्न कसा मिटवावा, ही डोकेदुखी अतिक्रमण विभागासमोर आहे. प्रशासनाने नियुक्त केलेली जागा ही व्यवसायाच्या दृष्टीने गैरसोयीची आहे. त्याठिकाणी भाजी घ्यायला नागरिक येत नसल्याने उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यावसायिकांमध्ये आहे. त्यामुळे व्यावसायिक रस्त्याच्या कडेलाच भाजी व्यवसाय करण्यामध्ये जास्त उत्सुकता दाखवत आहेत.

शिवाजी मार्केटमधून आम्ही क्लब हाऊस जवळ येऊन बसलो असलो तरी या ठिकाणी प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. महिलांसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, विद्युत योजना नसल्याने संध्याकाळनंतर व्यवसाय करणे कठीण झाले आहे.

नागेश घोडके, भाजी विक्रेता