सोसायटी निवडणूकीत सभासदांकडून शिकवण ?

सोसायटी निवडणूकीत सभासदांकडून शिकवण ?

दिंडोरी । संदिप गुंजाळ | Dindori

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) सोसायटी निवडणूका (election) अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या झाल्या. त्यात सर्वात लक्षवेधी ठरली ती मोहाडी (mohadi) सोसायटी निवडणूक. अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणूकीत एका पॅनलला काठावर बहुमत मिळाले खरे पण चर्चा झाली ती सभासदांची.

आपला जवळचा उमेद्वार कोण? यावर भर देवून सभासदांनी आपल्याच सोयीनुसार उमेद्वारांना पसंती दिल्याने मोहाडीतील स्थानिक उमेद्वारांची येथे वर्णी लागली व अंतर्गत इतर गावातील उमेद्वारांना मात्र पराभव पत्कारावा लागला. यामुळे अंतर्गत गावांमध्ये नाराजी पसरली असून नेतृत्वापुढे नाराजी दुर करण्याचे आवाहन निर्माण झाले आहे. मोहाडी सोसायटीची निवडणूक यावेळी जरा जोरदारच झाली. मोहाडी अंतर्गत खडकसुकेणा, कुर्णोली, अक्राळे, गणेशगाव ही गावे येतात. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद गटनेते प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वाखाली क्रांती पॅनल तर कादवा कारखान्याचे संचालक शहाजी सोमवंशी (Shahaji Somvanshi, director of Kadva factory) यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी (farmers) विकास पॅनलची निर्मित्ती झाली.

नुकत्याच झालेल्या कादवा साखर कारखाना (kadva sugar factory) निवडणूकीत प्रवीण जाधव यांच्या उमेद्वारी अर्जावर आक्षेप घेण्याच्या मुद्यावरुन प्रवीण जाधव व शहाजी सोमवंशी यांच्यातील राजकारण आणखीच तापले होते. दोन्ही पॅनलच्या समर्थकांनी प्रतिस्पर्धी पॅनलला पराजयाची धुळ चारत आपला पॅनल निवडून आणायचाच हा मनाशी चंग बांधला. त्या दृष्टीने जोरदार तयारीही केली. विशेष म्हणजे मोहाडी गावापेक्षा खडकसुकेणा, कुर्णोली, अक्राळे, गणेशगाव या गावांमधील दोन्ही पॅनलच्या नेतृत्वाच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह व स्पर्धा निर्माण झाली होती. सोशल मीडीया (social media) असो की इतर माध्यम प्रतिस्पर्धी पॅनलवर आगपाखड करण्याची एकही संधी समर्थकांनी सोडली नाही. दिवसेंदिवस प्रचारात रंगत आणली.

शिट्टी आणि कपबशीच्या प्रचाराने अक्षरक्षा धुमाकूळ घातला आणि शेवटी मतदानाचा दिवस आला. मतदानाच्या दिवशी देखील दोन्ही पॅनलने दिलेल्या मंडपात सभासदांना खोली क्रमांक व अनुक्रमांक देण्यासाठी कार्यकर्ते जमा होते. यात खडकसुकेणा, कुर्णोली, अक्राळे, गणेशगाव येथील समर्थकांची उपस्थिती लक्षणीय होती. कोणता पॅनल निवडून येईल, याची चर्चा सुरु झाली. दोन्ही पॅनलचे नेतृत्व व समर्थकांनी प्रचंड मेहनत घेवून विजयापर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक त्या हालचाली पुर्ण केल्यामुळे विजय कुणाचा याची शाश्वती कुणालाही देता येत नव्हती. दोन्ही पॅनलमध्ये असलेली चुरस बघता पॅनलचे सर्वच्या सर्व उमेद्वार निवडून येतील, अशी अपेक्षा सर्वांना होती.

परंतू तो पॅनल कोणता असेल यात संभ्रम होता. परंतू सगळ्याचे निष्कर्ष फोल ठरत निकाल धक्कादायक लागला. मोहाडीच्या सभासदांनी नेतृत्वाच्या वादात न पडता गावच्या उमेदवारांना पसंती देत एक नवीन आदर्श घालून दिला. नको त्या वादात पडून संबंध खराब करुन घेणार्‍यांसाठी ही एक शिकवणच दिली गेली. त्यामुळे ही निवडणूक (election) होती की शिकवण याची चर्चा सुरु झाली. मोहाडी सोसायटीचा निकाल हाती येताच सर्वांना धक्काच बसला.

कारण दोन्ही पॅनलच्या उमेद्वारांना सभासदांनी पसंती दिली. त्यात क्रांती पॅनलला सात जागा तर शेतकरी विकास पॅनलला सहा जागा मिळाल्या. क्रांती पॅनलला काठावर पास करुन सत्तेची चावी सभासदांनी दिली असली तरी चर्चा झाली ती विजयी झालेल्या उमेद्वारांच्या गावाची व समाजाची. फक्त मोहाडीतीलच उमेद्वार निवडून आले. त्यात फक्त कुर्णोली गावच्या एका उमेद्वाराला विजय मिळवता आला. परंतू अक्राळे, खडकसुकेणा, गणेशगावच्या उमेदवारांना विजयापर्यंत पोहचता आले नाही.

त्यामुळे सोशल मीडीयावर प्रचंड संताप व्यक्त करत कुणी विश्वासघाताचा मुद्द्ा मांडला तर कुणी मोठ्या गावाने एकत्र होवून इतर गावच्या उमेद्वारांना नाकारले, अशी चर्चा झाली. तर काहींनी यात समाजवाद देखील आणला. हे चर्चिले जाणारे मुद्दे पॅनलच्या नेतृत्वाला डोकेदुखी ठरली हे देखील तितकेच सत्य. दोन्ही पॅनलच्या नेतृत्वांना मनधरणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात सुरुवात केली आहे. यावेळी बाद मतांचा फटका बसल्याचा अंदाज लावला गेला. परंतू बाद मतांचा फटका स्थानिकांना का बसला नाही? यावर देखील चर्चा जोरदार झाली.

निवडणूक प्रतिष्ठेची समजून आपण पराभूत होवू नये, यासाठी स्वतंत्र मतदान काही उमेद्वारांनी मागितली व मतदारांनी गरजेपेक्षा जास्त फुल्या मारल्याने मतदान बाद झाले. यावरही चर्चा झाली. इतर निवडणुका प्रमाणे ही निवडणूक मतदारांना जरा अवघडच होती. कारण इतर निवडणूकीत एकाच उमेद्वाराला मतदान देण्याचा अधिकार असतो. परंतू येथे जास्त उमेद्वारांना मतदान करण्याचा अधिकार असल्याने प्रमाणापेक्षा जास्त फुल्या मारुन मतदान बाद करण्याचा प्रकार जास्त झाला. दोन्ही पॅनलच्या समर्थक मतदारांना समजून सांगण्यात कमी पडले हे देखील तितकेच वास्तव आहे. परंतू परायज व विजय यातील खरी बाजू समजून घेवून सभासद अथवा मतदारांनी यातून धडा घेवून त्याची पुढची रणनिती आखणे गरजेचे असून वादापेक्षा विकासाला महत्व देणे गरजेचे असल्याची शिकवण यातून घेण्याची आवश्यकता आहे.

ही निवडणूक नेतृत्वाच्या वादात उडी घेत आपले संबंध खराब करुन घेणार्‍यांसाठी विशेषत: शिकवण आहे. मतदारांना वादात उडी घेवून संबंध खराब करुन घेण्यापेक्षा आपल्या मर्जीच्या व उपयोगी येणार्‍या उमेद्वारांमागे उभे राहण्यात जास्त रुची असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे वादाऐवजी विकासाकडे कल देणे अपेक्षित आहे. नको त्या वादात उडी घेत विनाकारण संबंध बिघडवण्यात स्वार्थ कुणाचा? यावर देखील विचारविनिमय करणे ही काळाजी गरज बनली आहे. नको त्या ठिकाणी वादात उडी घेवून संबंध विकोपाला नेणे यात कोणते शहाणपण? हेच समजून घ्यायला कुणी तयार नाही.

सोसायटी निवडणूक ही फक्त निमित्त मात्र ठरली. पण पुढे येत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांमध्ये ही शिकवण लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. उमेद्वार हा कोणत्या गटाचा अथवा पक्षाचा याचा विचार न करता तो किती कामाचा, त्याच्यात विकास करण्याची क्षमता किती? यावर लक्षकेंद्रीत करुन वादाच्या बाजूने नव्हे तर विकासाच्या बाजूला कल देवून परिसर व गावचा विकास करुन घ्यावे, हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.