शिक्षकांची वारी, विद्यार्थ्यांच्या दारी!

शिक्षकांची वारी, विद्यार्थ्यांच्या दारी!

निफाड। Niphad

मागील शैक्षणिक वर्षातील 2 महिने व चालू शैक्षणिक वर्षातील 4 महिने शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जात असल्याचे दिसत आहे.

विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात रहावे यासाठी शाळा, महाविद्यालयाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी देखील त्यास फारसे यश येतांना दिसत नाही.

साहजिकच शाळेची पटसंख्या टिकवून ठेवण्याबरोबरच विद्यार्थ्यांना देखील शिक्षणाची गोडी लागली पाहिजे यासाठी जि.प. शाळेचे शिक्षक आता वाडी-वस्ती, घरनिहाय विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करतांना दिसत आहे.

मागील शैक्षणिक वर्षातील मार्च महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शाळा, महाविद्यालये बंद करुन संचारबंदी आदेश जारी केले होते. मात्र त्यानंतर देखील करोनाचा संसर्ग वाढतच राहिल्याने यावर्षीच्या जूनमध्ये भरणार्‍या शाळा अद्याप सुरू झाल्या नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये चल-बिचल सुरू झाली आहे.

शाळा सुरू नसल्याने विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जात असल्याचे निदर्शनास येताच शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षण प्रणाली अस्तित्वात आणली. मात्र अनेक गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांंकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्याने त्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे अवघड झाले.

तसेच अनेक विद्यार्थी अँड्रॉईड मोबाईलचा वापर गेम खेळणे, चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे आदी कारणांसाठी करू लागल्याने ऑनलाइन शिक्षणाचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले.

परिणामी जि.प. शाळा प्रशासनाने शिक्षकांना चौक, वाडी, वस्तीवर जाऊन विद्यार्थ्यांना शिकविण्याचे आदेश काढल्याने हे शिक्षक आता वाडी-वस्तीसह विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे देऊ लागले आहेत.

मागील महिन्यापासून तालुक्याच्या प्रत्येक गावात जि.प. शाळेचे शिक्षक वाडी, वस्ती पिंजून काढत विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करू लागले आहे.

पुर्वी ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थी गुरुजनांच्या आश्रमात जात असत मात्र आता गावागावात शाळा, महाविद्यालये सुरू झाली. अत्याधुनिक ज्ञानदान प्रणाली अस्तित्वात आल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचा मार्ग सुलभ झाला. मात्र करोना प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालये बंद पडली. मात्र त्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना ज्ञानदान करता आले पाहिजे.

यासाठी गुरुजींची वारी विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत जात असल्याचे पहावयास मिळत असून ज्ञानदानाच्या कामात जिल्हा परिषदेचे शिक्षक, शिक्षिका सहभागी झाल्या आहेत.

महाविद्यालयात ऑनलाइन शिक्षण

प्राथमिक व माध्यमिक शाळांप्रमाणेच महाविद्यालये बंद असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ज्ञानदान मिळाले पाहिजे, यासाठी प्राध्यापक ऑनलाइन शिक्षण प्रणालीला महत्व देत असून महाविद्यालयात मात्र ही शिक्षण प्रणाली यशस्वी होतांना दिसत आहे. मात्र आता प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालये सुरू झाली पाहिजे अशी अपेक्षा विद्यार्थी व शिक्षक बाळगून आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com