शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन जमा
नाशिक

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन जमा

मुख्याध्यापक संघाला यश

Bharat Pagare

नाशिक | Nashik

वेतनदेयके सादर करण्यास विलंब झाल्याने जिल्ह्यातील २६ शाळांमधील सुमारे अडीचशे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारीचे वेतन रखडले होते. जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पाठपुराव्यामुळे कक्ष अधिकाऱ्यांनी देयके निकाली काढण्याचे आदेश दिल्यानंतर संबंधित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहे. त्यामुळे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘करोना’मुळे राज्यातील शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनात कपात केली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे २६ शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित राहावे लागल्याने ते आर्थिक कोंडीत सापडले होते. वेतनप्रश्नी जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण आयुक्तांना साकडे घातले होते.

अखेर कक्ष अधिकारी ज्योती शिंदे यांनी वेतनासाठी सकारात्मक भूमिका घेऊन प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश दिले होते. तत्काळ २६ पैकी २४ शाळांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला होता. उर्वरित दोन शाळाचे वेतन प्राथमिक शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.

मुख्याध्यापक संघाचे एस. के. सावंत, एस. बी. देशमुख, एस. बी. शिरसाठ, सुरेश शेलार, गुफरान अन्सारी, गुलाब भामरे, परवेजा शेख, संगीता बाफना, अशोक कदम, चंद्रकांत शेलार, योगेश पाटील, शिवाजी निकम आदींनी पाठपुरावा केला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com