शिक्षकांनी सांभाळली पाड्या वस्त्यांची धुरा!

आश्रम शाळांची शिक्षण यात्रा
शिक्षकांनी सांभाळली पाड्या वस्त्यांची धुरा!

नाशिक । दिनेश सोनवणे Nashik

करोना ( Corona ) प्रादुर्भावाच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरु झाल्यामुळे शहरी भागातील विद्यार्थ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला. मात्र, चिंता होती ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची. जिथे फोनवर बोलण्यासाठी एखादा डोंगर चढावा लागतो किंवा मोबाईल दिवसभर झाडावरच टांगून ठेवावा लागतो. या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरु करायचे तरी कसे असा प्रश्न होता. अशा परिस्थितीत आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे ऑफलाईन शिक्षण मात्र सुरु होते.

आश्रमशाळांत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी दुर्गम व अतिदुर्गम भागातील ( remote and inaccessible areas )आहेत. येथील पालक शेतकरी व एकही अल्पभुधारक आहेत. अनेकांना शेतमजुरीशिवाय पर्याय नाही. काम करेल तर चुल पेटेल अशी या भागाची अवस्था आहे. ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल घेणे अनेकांना शक्य नाही. अशा ठिकाणी शिक्षण पोहोचवणार कसे असे प्रश्न पावलोपावली संबंधिताना सतावत होते. मात्र, आदीवासी आश्रमशाळांतील अनेक शिक्षकांनी सहकार्याचा हात पुढे केला. शक्य तिथे ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली. जिथे मोबाईल काम करणार नाही तिथे शिक्षक जाऊन पोहोचले.

यातून निर्मिती झाली ती वस्तीशाळांची. पाड्यावर समाजमंदीरात शाळा भरू लागल्या. ज्या गावात जिल्हा परिषद शाळा आहेत तिथे हे विद्यार्थी जमू लागले. मंदीराच्या ओट्यांवर शिक्षक आले की वर्ग भरायला सुरुवात झाली. जिथे 50 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तिथे दोन शिक्षक दिले. त्यापेक्षा कमी असतील तर तिथे एक शिक्षक जाऊन विद्यार्थ्यांना शिकवू लागले.

विशेष म्हणजे, आदीवासी विकास विभागाच्या प्रकल्पातील विविध संस्थांचे विद्यार्थी पहिल्यांदाच एकत्र येऊन शिक्षण घेऊ लागले. एकलव्य आश्रमशाळा, आदीवासी आश्रमशाळा, बोर्डींग अशा विविध संस्थांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरुवातील समग्र याद्या करण्यात आल्या. त्यांनतर गावानूसार याद्या तयार झाल्या. विद्यार्थ्यांची संख्या बघून शिक्षकांची वस्ती, पाडे निहाय नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर शिक्षकांनी त्यांना नेमून दिलेल्या गावात जाऊन विद्यार्थी आणि पालकांची भेट घेतली. त्यानंतर या शाळा प्रत्यक्षात सुरु करण्यात आल्या.

शाळा व्यवस्थित सुरु आहेत का यासाठी एक वरीष्ठ शिक्षकांचे मंडळ तयार करण्यात आले. हे मंडळ वेळोवेळी गावागावांत जाऊन पाहाणी करून विद्यार्थी पालक यांच्या समस्या जाणून घ्यायचे. त्यानूसार, शिक्षकांना सुचना करत होते. यामुळे गुणवत्तापुर्ण शिक्षण तर विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचलेच शिवाय त्या संदर्भातील अडीअडचणींचा निपटारा क्षणार्धात होऊ लागला. परिणामी गेल्या वर्षीपासून इथे शिक्षणाचा टक्कादेखील वाढलेला दिसून येत आहे.

विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतिक्षेत, पण प्रश्न मार्गी

बालभारतीकडून अजून पुस्तक छपाईचे काम सुरु आहे. त्यामूळे विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाहीत. पण, मागील इयत्तेतील विद्यार्थ्यांची पुस्तके जमा करुन तात्पुरत्या स्वरुपात या विद्यार्थ्यांना देण्यात आली आहेत. स्वाध्याय पुस्तिकादेखील या विद्यार्थ्यांना दिली असून वेळोवेळी या विद्यार्थ्यांकडून यामाध्यमातून अभ्यास करवून घेतला जात आहे.

असे झाले मुल्यमापन

स्वाध्याय पुस्तिका देऊन त्यांच्याकडून गृहपाठ करून घेण्यात आला. यामूळे विद्यार्थी घरी बसूनही अभ्यासापासून दूर गेले नाहीत. स्वाध्याय पुस्तिकांच्या अभ्यासावरून मुल्यमापन करत या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात घेण्यात आले.

पालकांच्या चेहर्‍यावर हसू

आमच्याकडे दोन पाड्या आणि वस्त्यांची जबाबदारी आहे. सुरुवातील विद्यार्थी आणि शिक्षकांचा वेळ समजत नसल्याने अडचणी आल्या. मात्र, आता शिक्षक गावात ज्या वेळी येतील त्याआधीच विद्यार्थी वर्ग घेण्याच्या ठिकाणी पोहोचतात. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी गेल्यानंतर काही क्षणातच विद्यार्थी गोळा होतात. ग्रामस्थही अनोख्या शाळा पॅटर्नवर कमालीचे खुश दिसतात.

अरुण देवरे, आश्रमशाळा शिक्षक, इगतपुरी तालुका

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com