शिक्षक करोना कामातून मुक्त
नाशिक

शिक्षक करोना कामातून मुक्त

ऑनलाइन शिक्षणावर आता भर

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शासनाने निर्णय घेतला असून त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.

करोना संदर्भातील कामकाजातून शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून कार्यमुक्त करावे. तसेच कोणत्याही आस्थापनेवरील अतिरिक्त शिक्षकांना, समायोजन न झालेल्या शिक्षकांना ते राहत असलेल्या ठिकाणी जवळच्या शाळेत बोलावून ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेत त्यांचा उपयोग करून घ्यावा, असे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आले आहे.

मार्च महिन्यापासून करोनाचे थैमान सुरू असून या काळात विविध शहरात अडकून पडलेल्या मजुरांची शाळेत व्यवस्था करणे, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, चेक पोस्टवर ड्युटी अशी कामे शिक्षकांना देण्यात आली होती. त्यांची आता या कामातून मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला असून त्यांना आता ऑनलाईन शिकविण्यावर लक्ष देता येणार आहे.

करोनाच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकांना त्यातून मुक्त करण्याचे आदेश राज्य सरकारने २४ जूनरोजी दिले होते. त्यानंतरही स्थानिक स्तरावर मनपाने शिक्षकांना पुन्हा करोनाच्या कामासाठी बोलावून घेतले होते. राज्य शासनाने काढलेल्या आदेशाच्या आधारे या शिक्षकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊन यातून सूट देण्याची मागणी केली होती. पण त्यांना स्पष्ट नकार देण्यात येत होता. त्यामुळे शिक्षकांनी न्यायालयात देखील धाव घेतली होती.

करोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या घराघरात शिक्षण पोहोचविणे गरजेचे असताना या कामात अडकलेल्या शिक्षकांनी त्यांचा वर्ग दुसर्‍या शिक्षकांकडे दिला होता. त्यामुळे प्रत्येक वर्गाकडे ऑनलाईन लक्ष ठेवणे शिक्षकांना शक्य होत नव्हते. अखेर शिक्षण विभागाने ज्या शिक्षकांची सेवा करोना (कोविड) आजारासंबंधित कामकाजासाठी अधिग्रहीत करण्यात आली होती त्यांना कार्यमुक्त करावे, असे आदेश काढले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com