गुरुजींनी उभारले ऑक्सिजन युक्त २० बेडचे करोना सेंटर

गुरुजींनी उभारले ऑक्सिजन युक्त २० बेडचे करोना सेंटर

येवला । Yeola

देशभर करोना रुग्णांची वाढती संख्या, त्यात ऑक्सिजन बेड न मिळणे, दवाखान्यात जागा न मिळणे या घटनांनी सर्वांचीच हृदये पिळवटून निघतात. त्याला गुरुजीही अपवाद नाही. रोजच करोना प्रादुर्भावा मुळे अनेकजण हे जग सोडून जात आहेत.

या घटना तालुक्यात होऊ नये म्हणून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या गुरुजींनी चक्क 20 बेडचे ऑक्सिजन युक्त कोविड सेंटर सुरू करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

करोना संकटात येवला तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून या गुरुजींनी जमा झालेल्या सहा लक्ष रुपये मदतनिधीतून उपजिल्हा रुग्णालय येवला येथे तालुक्यातील गरीब व गरजू रुग्णासाठी 20 हायड्रोलीक बेड, गाद्या, बेडशीट, गरम पाण्याचे भांडे, वाफेचे मशीन, 20 जम्बो आक्सिजन सिलेंडर युक्त बेडचे आज ग्रामीण रुग्णालयात लोकार्पण केले. याचे उद्घाटन बाजीराव सोनवणे व इतर शिक्षकांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

या प्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे, ना. भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, प्रांत अधिकारी सोपान कासार, तहसिलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी डॉ. उन्मेष देशमुख, गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, आरोग्य अधिकारी शैलजा कुप्पास्वामी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक लोणारी, पत्रकार बांधव व सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती प्रतिनिधी उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षकांच्या योगदानातुन आरोग्य सुविधा मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. गेल्या महिनाभरापासून दररोज करोना बाधित रुग्णांचे हाल वर्तमानपत्रातून व समाज माध्यमातून पहात होतो. यातूनच आम्ही सर्व शिक्षकांनी एकत्र येउन हा उपक्रम राबवला असल्याचे राजेंद्र ठोंबरे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com