करवसुलीने मनपा तिजोरी भरली

घरपट्टीतून 149 तर पाणीपट्टीतून 65 कोटींचा महसूल
करवसुलीने मनपा तिजोरी भरली

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनामुळे करवसुली ( Tax Recovery ) ठप्प झाल्याने गेली दोन वर्षे आर्थिक कोंडीचा सामना करणार्‍या नाशिक महापालिकेचे ( NMC )अर्थचक्र करोना संपल्यामुळे पुन्हा रुळावर आले आहे. प्रशासनप्रमुख रमेश पवार, करवसुली विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करवसुली विभागाने विशेष परिश्रम घेतल्याने महापालिकेचा गल्ला भरला आहे. 31 मार्च अखेरपर्यंत घरपट्टीतून 149 कोटी 37 लाखांची तर, पाणीपट्टीची 64 कोटी 87 लाखांची विक्रमी वसुली झाली आहे.

रमेश पवार यांनी महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर करवसुलीकडे लक्ष केंद्रीत केले. करवसुलीसाठी उपायुक्त अर्चना तांबे यांच्यासह सहाही विभागीय अधिकारी थकबाकी वसुलीसाठी रस्त्यावर उतरले होते. त्याचे सकारात्मक परिणाम पालिकेच्या तिजोरीवर दिसून आले आहेत.

31 मार्च अखेर महापालिकेच्या तिजोरीत घरपट्टीतून ( House Tax )149 कोटी 37 लाख तर पाणीपट्टीतून ( Water Bills )64 कोटी 87 लाखांची विक्रमी वसुली झाली आहे. विशेष म्हणजे शेवटच्या चार घरपट्टीची 12 कोटी 27 लाख तर,पाणीपट्टीची चार कोटी 87 लाख असे एकूण 17 कोटी 14 लाखांची वसुली झाली आहे. कर वसुली विभागाने गेल्या दोन महिन्यात बड्या थकबाकीदारांकडे वसुलीसाठी तगादा लावत नोटीस अस्राचा वापर केल्यामुळे गेल्या पाच वषार्तील विक्रमी वसुली करण्यात करवसुली विभागाला यश आले आहे.

नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेस व्यवस्थापनाकडे महापालिकेची तब्बल 17 कोटी रुपयांची घरपट्टी थकीत आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असले तरी वसुलीविरोधात कुठलेही स्थगिती आदेश नसल्यामुळे उपायुक्त(कर) तांबे यांनी प्रेस व्यवस्थापनाशी वसुलीसंदर्भात चार दिवसापासून चर्चा सुरू ठेवली होती. अखेर शेवटच्या दिवशी एक कोटी 9 लाखांचा भरणा केला आहे. महापालिकेचे 1581 गाळे धारकांना थकबाकी भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. गाळेधारकांना 48 तासांच्या नोटीसा काढण्यात आल्या होत्या रक्कम अदा न केल्यास गाळे सील केले जाणार होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com