करोना नियंत्रणासाठी सिन्नरला टास्क फोर्स

114 गावे, शहरातील 14 प्रभागांत टीम सज्ज
करोना नियंत्रणासाठी सिन्नरला टास्क फोर्स
करोना

सिन्नर । प्रतिनिधी

करोना संसर्गाला अटकाव घालण्यासाठी लादलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी सिन्नर तालुक्यात टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. ग्रामीण भागात सरपंच, ग्रामसेवक, पोलीसपाटील आणि पोलीस सेवक तर शहरात प्रभागातील दोन नगरसेवक, नगरपालिकेचा अधिकारी किंवा सेवक आणि पोलीस किंवा गृहरक्षक दलाचे जवान अशा चौघांचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

पोलिसांचा या पथकात समावेश करण्यात आल्याने कायदा सुव्यवस्था राखून करोनाला अटकाव घालण्यास मदत होणार असल्याचे तहसीलदार राहुल कोताडे यांनी सांगितले.

सिन्नर शहरातील 14 प्रभाग आणि ग्रामीण भागातील 114 गावांमध्ये टास्क फोर्सची टीम सज्ज करण्यात आल्याचे आदेश तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, मुख्याधिकारी संजय केदार, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या स्वाक्षरीनिशी काढण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत सुरू असलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणावर पर्यवेक्षण करणे, सर्वेक्षण योग्यरितीने सुरू असल्याची खात्री करणे, कार्यक्षेत्रातील करोनाची लक्षणे दिसून आलेल्या व्यक्तींची तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करणे, कार्यक्षेत्रात संस्था विलगीकरण केंद्र सुरू करणे,

पॉझिटिव्ह आढळलेल्या व गृहविलगीकरणास पात्र असलेल्या व्यक्तींना गृहभेटी देऊन अशा व्यक्तींच्या घरी स्वतंत्र निवास व्यवस्था असल्याची व बाधित व्यक्ती घरातील इतर व्यक्तींच्या संपर्कात येणार नाही अशा व्यवस्थेचे पालन होत असल्याची खात्री करणे, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या मात्र 14 दिवसांपर्यंत विलगीकरणाचे नियम पाळत नसलेल्या व्यक्तींना पुन्हा संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल करणे आदी गोष्टी या टास्क फोर्सच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com