नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

उन्हाळ्यात नाशिक क्षेत्रातील विविध डाेंगर, वनजमिनीनींना आग लागते वा लावली जाते. त्यामुळे असे वन वनवे राेखण्यासाठी नाशिक वनविभागाने आठ टास्क फाेर्स स्थापन केल्या आहेत.

आठ वनपरिक्षेत्रांतर्गत त्यांनी त्या वनपरिक्षेत्रातूनच पाच कर्मचाऱ्यांनी निवड करून ‘वणवा प्रतिबंधक टास्क फोर्स’ तयार केली आहे. टास्क फोर्सचे कर्मचारी वणव्याचा ‘कॉल’ येताच तत्काळ घटनास्थळी रवाना हाेतील.

गावकऱ्यांची मदत घेत तत्काळ आग विझविण्याचे कार्य हाती घेईल. तोपर्यंत दक्षता पथक, जवळील दुसऱ्या वनपरिक्षेत्राचे ‘टास्क फोर्स’ देखील वणवा विझविणाऱ्या टास्कफोर्सच्या मदतीसाठी धाव घेतील, असे आदेश देण्यात आले आहेत, असे नाशिक पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी सांगितले आहे.

यासाठी प्रत्येक वनपरिक्षेत्रातून पाच वनरक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यांना सहायक वनसंरक्षकांमार्फत कार्यशाळेतून वन वणवा विझविण्याकरिता साधनसामुग्रीचा वापराबाबत धडे दिले जात आहे.

या टास्क फोर्सला आग विझविण्याचे फायर एअर ब्लोअर, फायर बॉल, तसेच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा सुट, हलके हेल्मेट, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांसह आवश्यक साधनेही पुरविण्यावर भर दिला जात आहे.

वणवा प्रतिबंध कार्यशाळा

जिल्ह्यातील गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील ननाशी, बाऱ्हे, पेठ यांसारख्या वनपरिक्षेत्रांत वणवा प्रतिबंधक कार्यशाळाही घेण्यात आल्या आहेत. सर्वच परिक्षेत्रांत अशा कार्यशाळा घेतल्या जाणार आहे.

सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल दर्जाचे अधिकारी वनरक्षकांना याद्वारे धडे देणार आहेत. नाशिक, पेठ दक्षता मोबाईल पथकांनाही वणवा प्रतिबंधक मोहिमेसाठी सज्ज राहण्याचा ‘अलर्ट’ देण्यात आला आहे. आपत्कालीन दूरध्वनी यंत्रणा कार्यान्वित आहे.