पितृ पंधरवड्यात सध्या काकस्पर्शाची भासतेय उणीव

पितृ पंधरवड्यात सध्या काकस्पर्शाची भासतेय उणीव

पंचवटी | प्रतिनिधी

पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी तर्पण,पिंडदानाला अधिक महत्व आहे. नाशिक-पंचवटी गोदाकाठावर रामकुंड येथे व परिसरात तर्पण आणि पिंडदान विधी केल्याने पिंतरांना सदगती प्राप्त होत असल्याची धारणा आहे. परंतु, पितृ पंधरवड्यात काकस्पर्शाची मोठया प्रमाणात उणीव भासत असल्याचे आज दिसून येत आहे.

नाशिक सिंहस्थ-कुंभमेळा नगरीत पंचवटी-रामकुंड गोदावरी नदीच्या काठावर देशभरातून पिंडदानासाठी येणाऱ्या भाविकांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते आहे. नाशिक पुण्यभुमी ही प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. त्यामुळे इथे देवदेवतांनी वास्तव्य केल्याने गोदाकाठी श्राध्दविधीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे देशभरातून भाविक येथे विविध प्रकारच्या विधीसाठी येत असतात. प्रामुख्याने येथे पितृपक्षात काकभोजनाला अधिक महत्व आहे. याठिकाणी पितृपक्षात गायींना व कावळयास भोजन दिल्याने पुण्य प्राप्त होते,असेही मानले जाते.

भाद्रपद पौर्णिमेला,वर्षातील कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध केले जाते. अश्विन अमावस्येला भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी देह सोडणाऱ्यांचे तर्पण करण्याचा सल्ला शास्त्रात दिला आहे. वर्षाच्या कोणत्याही पक्षात,ज्या तिथीला कुटुंबातील पूर्वजांचा मृत्यू झाला असेल,त्याच तिथीला पितृपक्षात श्राद्ध करावे.

दरम्यान,"कावळा" हा पक्षी इतर वेळी उपद्रवी,अस्पृश्य समजला जातो. उकिरड्यावर आपले खाद्य शोधणारा,मेलेले प्राणी खाणारा कावळा सहसा कुणालाच आवडत नाही. त्याचे ओरडणे कर्कश असल्याने त्यांना लोकांकडून तुच्छेतेची वागणूक मिळते. मात्र,याच कावळ्यांना पितृपंधरवडा सुरू झाला की सुगीचे दिवस येतात हे चित्र दिसून येते आहे. या पितृपंधरवाड्याच्या दरम्यान आपल्या घरातील पूर्वजांना त्यांच्या तिथीनुसार घास देण्याची प्रथा-परंपरा असल्याने या दिवसांत कावळ्यांना अधिक महत्त्व प्राप्त होते.

आपल्या पूर्वजांना नैवेद्य आजच्या आधुनिक युगातही पितरांसाठी नैवेद्य घराच्या कौलांवर पत्र्यांवर ठेवले जातात.यावेळी कावळयास घास घेण्यासाठी बालगोपाळांपासून ते वयोवृद्धापर्यंत "काव..काव" चा आवाज दिला जात असल्याचे दिसून येते आहे.पितृपंधरवडा मोठ्या श्रध्येने प्रत्येक घरात तसेच खेड्यापाड्यांत आजही कायम पाळला जातो. पितृपंधरवडा व्यतिरिक्त कावळ्यांची कुणालाही फारशी आठवण येत नाही.मात्र, या दिवसांत त्यांची काव..काव ऐकण्यासाठी आणि आपण टाकलेल्या नैवेद्यामध्ये कावळ्यांनी चोच लावण्यासाठी त्यांची तासनतास घरांच्या छतावर वाट पाहिली जाते आहे.

गणेशोत्सवानंतर लगेचच पौर्णिमेला या परंपरेचा प्रारंभ होतो. परंतु, सद्यस्थितीत कावळ्यांची संख्या कमी झालेली दिसून येते. पितरांच्या घासाला शिवण्यासाठी कावळ्यांना साद घालूनही ते फिरकेनासे झाले आहेत. अशावेळी शेवटी गाईला घास देऊन पुढील कार्यक्रम उरकून घ्यावे लागत आहे. असेही चित्र अनेक ठिकाणी दिसून येते आहे. शेवटी पितृ आमवस्येला त्याची सांगता केली जाते.

तर विशेष म्हणजे कावळ्याने जर नैवेद्य घेतला नाही किंवा घेण्यास उशीर झाला तरी घरातील कुणीही माणसे जेवत नाहीत. आजही बऱ्याच ठिकाणी ही परंपरा जपली जात आहे. एरव्ही शहरी भागातही ठिकठिकाणी ही परंपरा राखली जाते.हे आजच्या एकविसाव्या शतकात वैशिष्ट्यपूर्ण आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com