येवला : पाच गावांना टँकर मंजूर; 26 गावे प्रतीक्षेत

येवला : पाच गावांना टँकर मंजूर; 26 गावे प्रतीक्षेत

अवर्षणप्रवण पूर्व भागातील 31 गावे तहानलेली !

येवला । प्रतिनिधी

तालुक्यात जानेवारी-फेब्रुवारी उजाडताच पाणीटंचाईची दाहकता जाणवू लागते. आताही तब्बल 31 गावे टंचाईच्या वणव्यात भाजत असून त्यांनी टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. यातील पाच गावांना टँकरने पाणीपुरवठ्याला जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली आहे. तर 26 गावे अजून प्रतीक्षेत आहेत.

तालुक्यातील राजकारण पाण्याच्या नावाखालीच सुरू असून येथील प्रत्येक निवडणूक झाली खरी; परंतु पाण्याचा गहन प्रश्न वर्षानुवर्षे सुटलेला नाही.

ब्रिटीशकालीन दुष्काळी असलेला तालुका आजही शासनाच्या दुष्काळी यादीत वरच्या स्थानावर आहे. आजही पालखेड डावा कालव्याचे लाभक्षेत्र सोडले तर उर्वरित तालुका केवळ पावसाळ्यातच बागायती दिसतो. अर्ध्यावर तालुका अवर्षणप्रवण व डोंगराळी भाग असल्याने येथे किती पाऊस झाला तरी उत्तर-पूर्व भागाला टंचाईची दाहकता जाणवतेच. तालुक्याची यावर्षीची पर्जन्याची सरासरी 512 मिलीमीटर असताना तब्बल 792 मिलीमीटर (154 टक्के) पाऊस पडला असल्याने यंदा पाणीबाणी जाणवणार नाही, असा सर्वांचा अंदाज चुकीचा ठरला आहे.

कारण जानेवारीपासूनच उत्तर-पूर्व भागातील शेतकर्‍यांच्या विहिरींनी तळ गाठला आहे. तर मागील महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने डोके वर काढले आहे. अनेक गावांच्या पाणी योजना पाण्याअभावी कुचकामी ठरल्या आहेत. किंबहुना जलस्रोत आटल्याने पाणी योजनांसह हातपंपांनीही माना टाकल्याचे चित्र आहे. त्याच्यामुळे मार्चच्या शेवटी तब्बल 31 गावे टंचाईच्या वणव्यात भाजत आहेत. टंचाईग्रस्त नागरिकांना शेतातून सार्वजनिक विहिरीवरून किंवा शेतकर्‍यांच्या खासगी विहिरीवरून पाणी उपलब्ध करून तहान भागवावी लागत आहे. उत्तर पूर्व भागातील भूजल पातळीत मोठी घट झाल्याने वर्षानुवर्षे टंचाईची दाहकता अजूनच वाढत आहे. तालुक्यात 38 गाव पाणीपुरवठा योजनेचे 50 वर गावे टँकरमुक्त केली आहेत. त्याच धर्तीवर उत्तर पूर्व भागासाठीदेखील प्रभावी व यशस्वी योजना राबवण्याची अपेक्षा वर्षानुवर्षे व्यक्त होत आहे.

येथील पंचायत समितीकडे पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या गणेशपूर, तळवाडे-शिवाजीनगर, खरवंडी, देवदरी, ममदापूर व ममदापूर तांडा येथील प्रस्तावांना जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिल्याने येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू होईल, मात्र टँकरची प्रतीक्षा येथील प्रशासनाला आहे. याशिवाय कोळगाव, वाईबोथी, वसंतनगर, कुसमाडी, जायदरे, आहेरवाडी, भुलेगाव, रेंडाळे, गोरखनगर, अनकाई, कोळम खुर्द, कोळम बुद्रुक येथील टंचाईच्या परिस्थितीची तहसीलदार प्रमोद हिले व गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांनी सामूहिक पाहणी करून प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले आहे.

देवठाण, कासारखेडे, चांदगाव, भायखेडा, खामगाव, अनकाईची वाघ वस्ती व चव्हाण वस्ती, नगरसूल येथील मुळूबाई घाट, कटकेवस्ती, कापसे वस्ती, महादेवनगर, गणेशनगर, मानमोडी, नांदगावरोड वस्ती, घनामाळी मळा, चौफुली, बागल वस्ती, पवार वस्ती, राणूमाळी मळा, बारवाचा मळा, दादमळा, सोनवणे वस्ती, पहाडे वस्ती मोठामळा, चिखलेवाडी येथील प्रस्ताव तहसीलदारांनी पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे. सध्यातरी ही गावे पाण्यासाठी भटकंती करत असून टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.

टँकरचे प्रस्ताव प्राप्त होताच आम्ही पुढील कार्यवाहीसाठी पाठवतो. ग्रामीण भागात हातपंप दुरुस्तीची मोहीम वेगाने घेतली होती, यापुढेही उपायोजनाच्या बाबतीत पुरेपूर काळजी घेतली जाईल.

प्रवीण गायकवाड,सभापती, पंचायत समिती

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com